हायस्पीड ट्रेन, बुलेट ट्रेन हा भूलभूल्यया.
अजितदादांचा पक्ष आता ‘पटेलां’चा आणि ‘शहा’चा
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले असतानाच, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आज अनेक खळबळजनक दावे करत सत्ताधारी भाजप आणि महायुती सरकारवर तोफ डागली आहे. “अजित पवारांचा मृत्यू हा निव्वळ अपघात आहे की घातपात?” अशी शंका उपस्थित करत राऊतांनी या प्रकरणाला ‘जस्टीस लोहिया’ प्रकरणाची जोड दिली आहे.
अजित पवारांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करताना संजय राऊत म्हणाले की, “अजित पवार स्वगृही परतणे हा भाजपसाठी मोठा पराभव ठरला असता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, १५ जानेवारी रोजी दादांनी जाहीरपणे सांगितले होते की, ‘माझ्याकडे भाजपच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि ती मी उघड करीन.’ त्यानंतर अवघ्या १० दिवसांत त्यांच्या विमानाचा अपघात होणे हे अत्यंत रहस्यमय आहे.” अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले ५ प्रश्न गंभीर असून हे प्रकरण ‘जस्टीस लोहिया’ प्रकरणासारखे संशयास्पद वाटत असल्याचेही राऊत म्हणाले.
प्रफुल पटेल यांच्या अध्यक्षपदावरून पियुष गोयल यांनी घेतलेल्या ‘यू-टर्न’वर राऊतांनी टोला लगावला. “अजित पवारांचा पक्ष आता पवार किंवा पाटलांचा राहिलेला नाही. अमित शहांनी डाके टाकून तो पक्ष ताब्यात घेतला आणि आता तो पटेल, गोयल, शहा आणि मोदींचा झाला आहे. महाराष्ट्राची प्रादेशिक अस्मिता जपणाऱ्या पक्षाला भाजपने गिळून टाकले आहे,” अशी टीका त्यांनी केली.
दादांच्या नावावर कोणतीही बिले फाडू नये
अजित पवारांनी फडणवीसांसोबत राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा केली नसेल, याचा अर्थ त्यांचा फडणवीसांवर विश्वास नसेल. त्यांना स्वगृही जायचे असेल, तर फडणवीसांशी चर्चा करण्याची गरज काय? फडणवीसांचा पक्ष हा अखंड महाराष्ट्राच्या विरोधात, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या बाजून आहे. अशावेळी अजित पवारांसारखा नेता या भूमिकेवर काम करू शकणार नाही, हे आम्हाला माहीत आहे, असे संजय राऊत म्हणालेत.
अजित पवारांनी आपल्याशी चर्चा का केली नाही? याचे देवेंद्र फडणवीसांनी आत्मचिंतन करावे. इतर शंभर लोक बोलत आहेत ते खोटे आणि फडणवीस बोलायत ते खरे, हे चुकीचे आहे. आज अजित पवार नाहीत, त्यामुळे त्यांच्या नावावर कोणतीही बिले फाडू नयेत, असा टोला संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
हायस्पीड ट्रेन, बुलेट ट्रेन हा भूलभूल्यया.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काल अर्थसंकल्प फार चवदार लागल्याचा त्यांच्य प्रतिक्रियेवरून दिसून आले. जो महाराष्ट्र देशाच्या तिजोरीत सगळ्यात जास्त भरणा करतो, त्या महाराष्ट्राला अर्थसंकल्पात नक्की काय मिळाले हे मुख्यमंत्र्यांनी आणि केंद्रातील मंत्र्यांनी सांगावे. थातूर मातूर गोष्टी दिल्या असतील अन् तुम्ही या अर्थसंकल्पाचे कौतुक करता, हे धक्कादायक आहे. महाराष्ट्राचे ओरबाडायचे आणि महाराष्ट्रालाच द्यायचे नाही. आज दिल्लीतील शान-ओ-शौकत मुंबई आणि महाराष्ट्राच्या जोरावर आहे. पण अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काय आहे? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
हायस्पीड ट्रेन, बुलेट ट्रेन यांचा महाराष्ट्राला काही उपयोग नाही. हे सगळे तुम्ही गुजरातसाठी करत आहात. महाराष्ट्रातील मराठवाड्यात २०२५ मध्ये २१०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. हे निर्मला सीतारमन यांना माहीत नसेल, तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगायला पाहिजे. त्यामुळे अर्थसंकल्पात शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी काय आहे? हे नेहमीचंच आहे. तरीही महाराष्ट्राच्या जनतेला जागृत करण्याचे काम आम्ही करत राहू, असे संजय राऊत म्हणालेत.

