पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असताना, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर धर्मनिरपेक्ष व पुरोगामी जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, कोणत्याही परिस्थितीत शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षासोबत जाऊ नये, अशी ठाम भूमिका रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी आज शरद पवार यांना पत्र लिहून आपली भूमिका कळवली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र येऊन निवडणूक लढवल्यानंतर, आगामी काळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलिनीकरण होऊन शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्ष कै. अजित पवार यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएचा घटक पक्ष होईल, अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. या चर्चांमुळे धर्मनिरपेक्ष व पुरोगामी मतदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, अशी कोणतीही कृती शरद पवार यांच्याकडून होऊ नये, अशी अपेक्षा विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
अनेक नागरिक तसेच विविध पक्ष संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर राहुल डंबाळे यांनी शरद पवार यांना भाजपसोबत न जाण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या प्रामुख्याने स्थानिक प्रश्न व विकासाच्या मुद्द्यांवर लढवल्या जातात. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याच्या निर्णयाकडे मतदारांनी सुरुवातीला सकारात्मक दृष्टीने पाहिले होते. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत बहुतांश मतदारांनी काँग्रेस तसेच इतर स्थानिक उमेदवारांना मोठे मताधिक्य दिले आहे.
या सर्व बाबींचा विचार करून पवार साहेब योग्य व लोकभावनेला अनुसरून निर्णय घेतील, अशी अपेक्षा राहुल डंबाळे यांनी व्यक्त केली आहे.

