मुंबई (प्रतिनिधी) – भारत सरकारच्या साहित्य अकादेमीच्या आयोजनाखाली मुंबई विद्यापीठाच्या शाहीर अमरशेख अध्यासन आणि लोककला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी ‘मराठी वगनाट्य परंपरा आणि योगदान’ या विषयावर प्रथमच परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे.
मराठी लोकनाट्य परंपरेतील वगनाट्याचा ऐतिहासिक प्रवास, त्याचे सांस्कृतिक योगदान आणि समाजजीवनावर झालेला प्रभाव यावर या परिसंवादात सखोल चर्चा होणार आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवर अभ्यासक, कलावंत आणि तज्ज्ञ या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत.
हा परिसंवाद कलिना येथील मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक भवनाच्या तिसऱ्या मजल्यावर दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी १०.३० ते ११.४५ या वेळेत होणाऱ्या पहिल्या उद्घाटनपर सत्रात ९९ व्या अखिलभारतीय मराठी साहित्यसम्लनाचे अध्यक्ष, विश्वास पाटील,मुंबई विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा रवींद्र कुलकर्णी ,पद्मश्री वामन केंद्रे, डॉ. प्रा. प्रकाश खांडगे, साहित्य अकादेमीच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी अधिकारी ओम प्रकाश नागर उद्घाटनपर भाषण करणार आहेत. यावेळी मुंबई विद्यापीठाचे मानद प्रा. तमाशा सम्राट रघुवीर खेडकर यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल विशेष सत्कार आयोजित विद्यापीठातर्फे करण्यात आला आहे .
मौखिक परंपरा’ विषयावर निबंधवाचन…!
यानंतर ‘मराठी वगनाट्याची मौखिक परंपरा’ या विषयावर ज्येष्ठ अभ्यासक प्रभाकर ओव्हाळ यांच्या अध्यक्षतेखाली निबंधवाचन होणार असून यामध्ये अभ्यासक श्यामल गरुड, लोककलेचे अभ्यासक संतोष खेडलेकर, मंत्रालयातील ज्येष्ठ पत्रकार,लोककलेचे अभ्यासक आणि महाराष्ट्र शासनाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार सन्मानित खंडूराज गायकवाड हे सहभागी होणार आहेत.
सत्र दुसरे
मराठी वगनाट्य परंपरा:शाहीरांचे योगदान…!
दुपारच्या दुसऱ्या सत्रात ‘मराठी वगनाट्य परंपरा : शाहीरांचे योगदान’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या चर्चा सत्रात लोककलेचे अभ्यासक सोपान खुडे, सुप्रसिद्ध मराठी अभिनेते आदेश बांदेकर आणि रणधीर शिंदे सहभागी होणार आहेत.
मराठी लोककलेच्या इतिहासात वगनाट्यावर प्रथमच अशा स्वरूपाचा परिसंवाद होत असून पार्श्वभूमी लोककला व लोकसाहित्याचे अभ्यासक,तज्ञ्, विचारवंत, कलावंत, कला रसिक यांनी या चर्चा सत्रात सहभागी व्हावे.असे आवाहन मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.गणेश चंदनशिवे यांनी केले आहे.

