साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित काव्य महोत्सवात ‘समाजमाध्यमांचा कवितेवर होणारा परिणाम’ या विषयावर परिसंवाद
पुणे : कविता समाजमाध्यमांवर गेली की तिचे लोकशाहीकरण, संक्षिप्तीकरण तसेच सरसकटीकरण आणि सुमारीकरणही होते. ज्या योगे तिचा स्मरणकालही कमी होतो. केलेले लिखाण समाजमाध्यमांवर टाकण्याची घाई असल्यामुळे त्यातील वैचारिक आणि शिकण्याची प्रक्रिया खुंटते. समाजमाध्यमांमुळे वाचनाचे माध्यम बदलताना दिसत असले ती त्यावर मिळणारी लोकप्रियता याविषयी अभ्यास होणे आवश्यक आहे, असा सूर परिसंवादात उमटला. अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे समाजमाध्यमांवर आलेले साहित्य सहजपणे चोरले जाऊ शकते तसेच दुसरीकडे कंपूशाहीमुळे उत्तम साहित्य देखील दुर्लक्षित राहू शकते, असा धोकाही दर्शविण्यात आला.
कला, साहित्य क्षेत्रात १५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवस कवितेसाठी या काव्य महोत्सवात आज (दि. १) ‘समाजमाध्यमांचा कवितेवर होणारा परिणाम’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मान्यवर वक्त्यांनी आपली भूमिका रोखठोकपणे मांडली. यात आश्लेषा महाजन, अभिजित थिटे, प्रणव सखदेव, डॉ. वर्षा तोडमल यांचा सहभाग होता तर सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. राजा दीक्षित अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री निरुपमा महाजन यांनी केले. भारत इतिहास संशोधन मंडळातील वि. का. राजवाडे सभागृहात काव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. वर्षा तोडमल म्हणाल्या, नवसमाज माध्यमांचा कवितेवर सकारात्मक व नकारात्मक परिणाम होतो. व्यक्त होण्यास व्यासपीठ लाभल्यामुळे ग्रामीण भागातील कवी देखील आपल्या बोली भाषेत संवेदना व्यक्त करत दबलेला आवाज पुढे आणू शकतात. तसेच प्रकाशक-संपादक या दालनातून पुढे पुस्तक प्रकाशन ही प्रक्रिया टाळता येऊ शकते. परंतु समीक्षकाच्या हाताखालून तावून सुलाखून निघालेले काव्य समाजमाध्यमातून प्रकट होत नाही त्यामुळे त्याचे अस्तित्व काही काळच टिकू शकते.
अभिजित थिटे म्हणाले, समाजमाध्यमांवर व्यक्त होणाऱ्या साहित्याला कंपूशाहीचा फायदा व तोटाही होतो. ठराविक व्यक्तीचे काव्य, साहित्य समाजापर्यंत पाहोचते तर माध्यमे योग्य पद्धतीने हाताळली न गेल्यास अस्सल भावना समाजापर्यंत पोहोचू शकत नाहीत. कविता मेंदूतून हृदयात झिरपत जाण्याला लागणारा कालावधी समाजमाध्यमांमुळे कमी झाला आहे. समाजमाध्यमांचा वापर व्यावसायिक दृष्टीने होण्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आश्लेषा महाजन म्हणाल्या, शिक्षणाचे व अभिव्यक्तीचे लोकशाहीकरण झाल्यामुळे स्त्रियांचे समाजमाध्यमांवर व्यक्त होण्याचे प्रमाण जास्त दिसते. पिढी बदलानुसार अभिव्यक्तीची निकड बदलेली जाणवते ज्यातून लेखनाची भाषा, प्रतिक्रियेचा कालावधी बदलताना जाणवतो.
प्रणव सखदेव म्हणाले, समाजमाध्यमांवर व्यक्त होत असताना भाषा आणि शब्दांचा वापर यावर विचार होणे गरजेचे आहे. मानवी स्वभाव, गटबाजी जाणवत असताना सत्तास्थाने भेदण्याचे कार्य समाजमाध्यमांद्वारे केले गेले, त्यामुळे नव कवींना आपली बंडखोरी दाखवत स्वतंत्र मार्ग शोधणे सोपे होत गेले.
कृत्रिम बुद्धीमत्तेकडे सर्जनशीलता नाही..
कृत्रिम बुद्धीमत्तेतून उमटणारे साहित्य हा आत्म्याचा आवाज नाही, प्रतिभेला चालना दिल्याशिवाया पेशी उत्तेजित होत नाहीत आणि सर्जनशीलतेतून व्यक्त होणे शक्य नाही, असे मत मांडून कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर अनुवादासाठी तसेच इतर भाषेतील साहित्याचा अभ्यास करण्यासाठी होऊ शकतो, असे वक्त्यांची सूचित केले.
तो पर्यंत मानवाचे कवी असणे अबाधित : डॉ. राजा दीक्षित..
अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. राजा दीक्षित म्हणाले, समाजमाध्यमांचा संदर्भ जागतिकीकरणाच्या प्रक्रियेशी जोडला गेला आहे. संज्ञापन क्रांती, ज्ञानविस्फोट, माहिती तंत्रज्ञान यांचा फक्त कवितेवरच नव्हे तर मानवी जीवनावरही मोठा परिणाम झाला आहे. या विषयी आस्था आणि चिंता वाटते. कवितेतून जोपर्यंत जगण्याचा अनुभव, चिंतनशीलता प्रकट होत राहील तो पर्यंत मानवाचे कवी असणे अबाधित राहणार आहे. समाजमाध्यमांचा वापर करताना विवेकवल्लीची लावणी करणे आवश्यक आहे.
मान्यवरांचे स्वागत साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ज्योत्स्ना चांदगुडे, कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर, वि. सु. चव्हाण, डॉ. संदीप अवचट यांनी केले.

