पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या साहित्य संवर्धन आघाडीने प्रचारासाठी आयोजित केलेल्या खासगी ऑनलाईन बैठकीचे बेकायदा रेकॉर्डिंग करून ते प्रसारित करीत बदनामी केल्याप्रकरणी प्रतिस्पर्धी परिवर्तन उत्कर्ष आघाडीचे उमेदवार विनोद कुलकर्णी यांच्याविरोधात जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. संबंधित बैठकीत काहीही आक्षेपार्ह नसताना विनाकारण गवगवा करत कुलकर्णी यांनी आपली बदनामी केली असून, गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन केल्याचा आरोप बैठकीच्या आयोजकांनी केला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
राजेंद्र लखीचंद नन्नावरे (वय ५६, रा. जळगाव) यांनी या विषयी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यामध्ये विनोद कुलकर्णी यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५६ (बदनामी), कलम ४९९ व ५०० (मानहानी) आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ ई व ७२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या नियोजनासाठी खाजगी ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या रेकॉर्डिंगसाठी कोणतीही संमती देण्यात आली नव्हती. मात्र, विनोद कुलकर्णी यांनी या बैठकीचे गुपचूप रेकॉर्डिंग केल्याने गोपनीयतेचा भंग झाला. त्यानंतर कुलकर्णी यांनी या रेकॉर्डिंग चा वापर करून पुण्यात पत्रकार परिषद घेत खोटी व बदनामीकारक विधाने केली, असे तक्रारीत म्हटले आहे.
’या अनधिकृत रेकॉर्डिंगचा आधार घेत माझ्या विरोधात चुकीची आणि बदनामीकारक विधाने करण्यात आली आहेत. यामुळे माझ्या सामाजिक आणि व्यावसायिक जीवनावर गंभीर परिणाम झाला आहे,’ असे तक्रारदारांनी अर्जात नमूद केले आहे. जळगाव सायबर गुन्हे शाखा या प्रकरणाची तांत्रिक चौकशी करत आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत अभिजात मराठी भाषेतील साहित्य संवर्धनाविषयी उहापोह होणे अपेक्षित आहे. याच प्रकारचा प्रचार साहित्य प्रेमी मतदारांना अपेक्षित आहे. परंतु विरोधक उणीदुणी काढत, यात राजकारण आणत आहेत.
- राजेश पांडे

