मुंबई | दि. ३१ जानेवारी २०२६ :
कैलासवासी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी आणि न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने पवार कुटुंबावरच नव्हे, तर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असल्याची भावना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.
या अत्यंत कठीण आणि वेदनादायी काळात, अजितदादांच्या पत्नी श्रीमती सुनेत्राताई पवार यांनी आज खासदारकीचा राजीनामा देत लोकभवन, मुंबई येथे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा प्रसंग कोणत्याही अर्थाने आनंदाचा नसून, तो जबाबदारीचा, कर्तव्याचा आणि सेवाभावाचा असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून राज्याच्या हितासाठी पुढे येणे हे मोठ्या धैर्याचे आणि मानसिक बळाचे द्योतक आहे. कैलासवासी अजितदादांच्या कार्याचा, विचारांचा आणि जनसेवेचा वारसा पुढे नेण्याची महत्त्वाची जबाबदारी आता सुनेत्राताई पवार यांच्यावर आली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कैलासवासी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना, सौ. सुनेत्राताई पवार यांना पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा देत, ईश्वर त्यांना हे दायित्व पेलण्याची शक्ती देवो, अशी भावना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

