५ फेब्रुवारीपर्यंत परवानग्या मिळवण्याची अंतिम संधी
हवेली, पुणे : हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार व राजकीय पक्षांना आवश्यक विविध परवानग्या सुलभ, जलद व पारदर्शक पद्धतीने मिळाव्यात, यासाठी हवेली तहसील कार्यालयात ‘एक खिडकी कक्ष’ कार्यान्वित करण्यात आला आहे. या सुविधेमुळे निवडणूक प्रक्रियेत गती येत असून उमेदवारांना एकाच ठिकाणी सर्व आवश्यक परवानग्यांची पूर्तता करता येत आहे. 7 फेब्रुवारीला निवडणूक असल्याने हा कक्ष ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहे.
या एक खिडकी कक्षाचे संचालन उपविभागीय अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने तसेच तहसीलदार तृप्ती कोलते, तहसीलदार अर्चना निकम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. कक्षामध्ये नोडल अधिकारी स्वाती नरोटे, डी. एम. मानकर, स्वाती ढोले, जयश्री सरगर, सुविद्य पवार, अक्षय लडकत, रोहन देवरे, सचिन जाधव, सारंग वाडेकर, संतोष हत्ते, सूर्यकांत राऊत व सुवर्णा भोसले हे अधिकारी कार्यरत आहेत.
या कक्षामार्फत प्रचार सभा, प्रचार रॅली, वाहन परवाने, ध्वनिक्षेपक वापर, पदयात्रा तसेच अन्य निवडणूकविषयक परवानग्या एकाच ठिकाणी देण्यात येत आहेत. उमेदवारांच्या अर्जांतील त्रुटी तात्काळ दूर करून आवश्यक मार्गदर्शन केले जात असल्याने परवानगी प्रक्रिया अधिक सुलभ व वेळेची बचत करणारी ठरत आहे.
या उपक्रमासाठी आरटीओ विभाग तसेच सर्व संबंधित पोलीस विभागांचे सहकार्य लाभत आहे. विविध विभागांच्या समन्वयामुळे हा कक्ष प्रभावीपणे कार्यरत असून आतापर्यंत अंदाजे १५० परवाने वितरित करण्यात आले आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी सर्व उमेदवार व राजकीय पक्षांना आवाहन केले आहे की, निवडणूक प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी ५ फेब्रुवारीपर्यंत आवश्यक सर्व परवानग्या एक खिडकी कक्षातून पूर्ण करून घ्याव्यात.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एक खिडकी कक्ष कार्यान्वित
Date:

