पुणे. दि.३१: पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीतील सोरतापवाडी (ता. हवेली) येथील इंजिनिअर दीप्ती मगर-चौधरी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सखोल तपासासाठी आणि आरोपींवर कठोर कारवाईसाठी, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे. हे प्रकरण हुंडा, शारीरिक-मानसिक छळ आणि बेकायदेशीर गर्भलिंग तपासणीशी संबंधित असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले असून, हा ‘पीसीपीएनडीटी’ कायद्याचा गंभीर भंग असल्याचे म्हटले आहे. तसेच हे प्रकरण ‘विशेष केस’ म्हणून हाताळण्याची मागणी केली आहे.
डॉ. गोऱ्हे यांच्या निवेदनात या प्रकरणात, ठोस पुरावे गोळा करण्याचे, तांत्रिक पुराव्यांवर भर देण्याचे आणि पीडित कुटुंबीयांना संरक्षण देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “या प्रकरणात पुरावे नष्ट होण्याची किंवा साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तपासाची व्याप्ती वाढवावी,” असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, दोषारोपपत्र लवकर आणि त्रुटीमुक्त सादर करण्याची विनंती केली आहे.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणाच्या अनुषंगाने दिलेल्या निवेदनात खालील मुद्यांकडे प्रामुख्याने लक्ष वेधले आहे.
या घटनेत शारीरिक व मानसिक छळ, हुंड्याची मागणी आणि प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या जाचाचे पुरावे समोर येत आहेत. अशा संवेदनशील प्रकरणांत आरोपींना ‘अर्नेशकुमार’ निकालाचा आधार घेऊन पळवाटेची संधी मिळू नये, यासाठी पोलिसानी घटनाक्रमातील विसंगती शोधून ठोस पुरावे गोळा करावेत.
या प्रकरणात बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी आणि पीडितेवर सक्तीने गर्भपात केल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. हा ‘पीसीपीएनडीटी’ (PCPNDT) कायद्याचा मोठा भंग असून, या गुन्ह्यातील सहभागी डॉक्टर किवा केंद्रांचा शोध घेऊन त्यांना सह-आरोपी करावे.
आरोपीकडून पुरावे नष्ट करणे किंवा साक्षीदारांवर दबाव आणण्याचे प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा प्रकरणांत तपासाची व्याप्ती वाढवून तांत्रिक पुराव्यांवर (उदा, कॉल डिटेल्स, वैद्यकीय अहवाल) भर द्यावा.
पीडितेच्या माहेरच्या व्यक्तींना धमकावण्यात येत असल्यास त्यांना तातडीने पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे.
दीप्ती मगर-चौधरी मृत्यू प्रकरणाचा तपास हा एक ‘विशेष केस’ म्हणून हाताळला जावा, जेणेकरून गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होईल. या प्रकरणातील दोषारोपपत्र (Charge-sheet) लवकरात लवकर आणि त्रुटीमुक्त सादर होईल याची खबरदारी घ्यावी, ही विनंती.

