साहित्य परिषदेच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या नावाचा आणि सरकारी यंत्रणेचा वापर केल्याचा आरोप
पुणे: सातारा येथे झालेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सरकारी यंत्रणांचा वापर करुन साहित्य संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहेत असे महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ठणकावून व्यासपीठावर सांगितले तेव्हा मी मुख्यमंत्री असेपर्यंत साहित्य संस्थांची स्वायत्तता अबाधित राहील. कोणत्याही साहित्य संस्थेत सरकार लक्ष घालणार नाही किंवा हस्तक्षेप करणार नाहीअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात सांगितले होते. मात्र संमेलन होऊन महिना होण्यापूर्वीच त्यांना खोटे ठरवण्याचा उद्योग त्यांचे नाव घेत पुणे पुस्तक महोत्सवाशी निगडीत राजेश पांडे यांनी केला आहे. त्यांनी दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी रात्री ९ वाजता राजेंद्र ननावरे यांच्या निमंत्रणावरून आयोजित केलेल्या एका झूम मीटिंगमध्ये साहित्य परिषद ताब्यात घेण्याचा उद्योग देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिंब्याने आणि मार्गदर्शनाने सुरू आहे असे जाहीर केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा जाहीरपणे स्पष्ट करणे गरजेचे आहे. साहित्य परिषदेच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या नावाचा आणि सरकारी यंत्रणेचा वापर केला जात आहे. विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गड़करी यांचे नाव आले, त्यावेळी त्यांनी ज्याप्रमाणे तातडीने लेखी खुलासा केला त्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करावा आणि त्यांच्याशी निगडीत लोकांना साहित्यधर्मात लुड़बुड़ करू नका असे बजावले पाहिजे आणि आपली निस्पृह भूमिका स्पष्ट केली पाहिजे. मुंबई मराठी साहित्य संघ आणि एशियाटिक बाबत जे घडले ते आम्ही महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बाबतीत घडू देणार नाही असे परिवर्तन उत्कर्ष आघाडीचे प्रमुख विनोद कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. प्रा. मिलिंद जोशी, सुनिताराजे पवार, शिरीष चिटणीस, अंजली कुलकर्णी, मृणालिनी कानिटकर जोशी, वि.दा.पिंगळे, माधव राजगुरु, प्रमोद आडकर, डॉ आशुतोष जावडेकर, राजन लाखे, राजीव बर्वे यावेळी उपस्थित होते.
कुलकर्णी म्हणाले, एनबीटीमार्फत शाखांना पैसे दिले जातील असे थेट आमिष दाखवून सरकारी यंत्रणांचा वापर राजेश पांडे करत आहेत. मतदारांना आमिष दाखवणे, निवडणुकीत सरकारी यंत्रणांचा गैरवापर करणे यासारखे प्रकार राजेश पांडे करत आहेत. योगेश सोमण यांच्या नावाने आपण पॅनल करतो आहोत हे या क्लिपमध्ये उघड म्हटलेले आहे. त्यामुळे योगेश सोमण यांच्यासह त्यांच्या पॅनलच्या सर्व उमेदवारांना अपात्र करण्यात यावे अशी मागणी आम्ही मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे केली आहे. तोंड लपवून झूम मीटिंगमध्ये बोलणारे पांडे हे एका पक्षाचे पदाधिकारी एनबीटीचा उल्लेख करत आहेत. वेगवेगळ्या संघटनांची नावे घेत आहेत आणि त्या संघटना आणि मी कुठेही समोर दिसणार नाही, असे सांगून छुप्या पध्दतीने साहित्य परिषद ताब्यात घेण्याची योजना बोलत आहेत. समोर येऊन लढण्यापेक्षा पाठीमागून हे वार करत आहेत. त्याचा अर्थ उघड़ आहे की यांच्या मनात पाप आहे, खोट आहे. मराठी साहित्य विश्वाची आणि मराठी विचारधारेची एवढी भीती त्यांना का वाटते आहे? याचा खुलासा त्यांनी करावा. एका मतदारापाठीमागे एक माणूस लावण्याची भाषा आणि लोकसभेप्रमाणे तयारी याचा अर्थ साम, दाम, दंड आणि भेद अशा सर्व आयुधांचा वापर करू, मात्र परिषद ताब्यात घेऊ ही भूमिका सर्व काही स्पष्ट करणारी आहे अशा प्रवृत्तींचा निषेधच केला पाहिजे.
सध्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुका सुरू आहेत. ही निवडणूक बेकायदेशीर आहे असे म्हणणाऱ्या मंडळींनी निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊन ही निवडणूक कायदेशीर आहे हे कृतीतून दाखवून दिले आहे. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. आमच्या आघाडीत सर्व विचारधारांचे उमेदवार आहेत. सर्वसमावेशक अशी ही आघाडी आहे.साहित्य हिच आमची विचारधारा आहे.आजवर कोणताही राजकीय पक्ष किंवा राजकीय विचारांची संघटना कोणत्याही साहित्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये उतरलेली नव्हती यावेळेसचे चित्र मात्र वेगळे आहे. विरोधी पॅनलचे उमेदवार समविचारी लोकांनी एकत्र येऊन पॅनल स्थापन केले आहेअसे जाहीरपणे सांगत असले तरी ते धादांत खोटे आहे. पडद्यामागून त्यांना कोणाचा पाठिंबा आहे. त्यांचा बोलविता धनी कोण आहे. आणि एनकेन प्रकारें साहित्य परिषद गिळंकृत करण्याचा कुणाचा डाव आहे हे आता स्पष्ट झाले आहे. त्याबाबतची ध्वनिचित्रफीत सर्व काही सांगणारी आहे. योगेश सोमण, स्वाती महाळंक आणि प्रदीप निफाडकर हे केवळ प्यादे आहेत. ज्यांना स्वतःचा विचार नाही आणि निर्णय घेण्याची क्षमता नाही असे लोक साहित्य परिषदेची स्वायत्तता कशी अबाधित राखणार ? आपल्या बोलवित्या धन्याचे नाव त्यांनी सांगावे.असेही कुलकर्णी म्हणाले. आमच्या परिवर्तन उत्कर्ष आघाडीने ३१ पैकी ३१ जागी उमेदवार उभे केले. विरोधी आघाडीला पुणे शहर वगळता इतरत्र उमेदवारही मिळाले नाहीत.पुणे जिल्हा वगळता सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे नंदुरबार आणि कोकणातील सर्व जिल्ह्यात आमच्या आघाडीचे १८ प्रतिनिधी बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे वरच्या तीन पदाधिकाऱ्यांच्या जागा निवडून आणण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे. त्यासाठी स्थानिक पोस्टाला मॅनेज करण्यापासून पत्रिका गोळा कशा करायच्या, गोळा केल्या तरी त्या कशा लगेच मतपेटीत टाकायच्या नाहीत याविषयी हे महाशय बोलत आहेत. पुण्यात एका व्यक्ती मागे एका कार्यकर्त्याची नेमणूक केल्याचेही त्यांनी सांगितले आहे. पुण्यातील नगरसेवकांनाही आपापल्या प्रभागातील पत्रिका गोळा करण्याचे आदेश दिल्याचे समजते. निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणुकीत हस्तक्षेप करणाऱ्या या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी आणि सदर व्यक्ती विरुद्ध तत्काळ फौजदारी कारवाई करावी असे पत्र त्यांना परिवर्तन उत्कर्ष आघाडीने दिले आहे. हे कुलकर्णी यांनी सांगितले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेवर प्रशासक आणण्याची भाषा आणि धमकी गेल्या तीन वर्षापासून दिली जात आहे. पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र साहित्य परिषदेने आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय पुण्याकडे आल्यानंतर महामंडळाने ठाम भूमिका घेत जाहीर विरोध केला. साहित्य संमेलनातही त्याचा पुनरुच्चार केला. त्याचा परिणाम म्हणून धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाखल असलेल्या केसेसमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेला आणि पदाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. साहित्य परिषदेशी संबंधित एका केस मध्ये एकाच दिवशी तीन आदेश बेकायदेशीररित्या काढण्यात आले त्यावेळी जैन बोर्डिंग प्रमाणे महाराष्ट्र साहित्य परिषद ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे महाराष्ट्र साहित्य परिषदेने एका पत्रकाद्वारे मागेच जाहीर केले होते. महाराष्ट्राचे धर्मादाय आयुक्त यांच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. निवडणुकीद्वारे संस्थेत येणे कठीण दिसू लागल्याने आणि प्रशासक आणण्यात यश न मिळाल्याने आता राजकीय पक्ष आणि संघटनांचा आधार ही मंडळी घेऊ लागली आहेत .हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी चित्र आहे.असेही कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

