पुणे : इतरा (ऐतरेय), जबाला, मदालसा, चुडाला, अपाला, विश्पला या तेजस्वी स्त्रिया प्राचीन भारतात होऊन गेल्या. समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे सामर्थ्य त्याही काळात स्त्रियांमध्ये होते. समाजात कर्तृत्व सिद्ध करणारी आणि स्वत्व जपायचे शिक्षण देणारी स्त्री त्याही काळात भारतात होती. तेजाला वय, जात, माणूस किंवा प्राणी याचे बंधन नसते, हे आपल्या प्राचीन भारताच्या इतिहासात पाहिल्यावर लक्षात येते, असे मत प्राचीन भारताच्या अभ्यासिका लेखिका डॉ. अंजली पर्वते यांनी व्यक्त केले.
श्री देवदेवेश्वर संस्थानच्या वतीने डॉ. अंजली पर्वते यांचे ‘प्राचीन भारतातील तेजस्वी स्त्रिया’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी श्री देवदेवेश्वर संस्थानचे प्रमुख विश्वस्त रमेश भागवत, संस्थानचे विश्वस्त सुधीर पंडित, पुष्कर पेशवा, जगन्नाथ लडकत, आशिष कुलकर्णी उपस्थित होते.
डॉ. अंजली पर्वते म्हणाल्या, प्राचीन भारतात लोखंडी पाय जिला बसवला होता अशी विश्पला नावाची स्त्री होती. जिने युद्ध करून राज्याचे थांबवलेले पाण्याचे प्रवाह मोकळे केले आणि राजाचा तसेच जनतेचा आदर मिळवला. अपाला जिला कुष्ठरोग असल्यामुळे तिच्या पतीने स्वीकारण्यास नकार दिला. त्यावेळी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. इतरा या त्या काळातील खालच्या जातीतील स्त्रीने आपल्या आणि मुलाच्या स्वतःसाठी लढा देऊन महिदास या तिच्या पुत्राने ऐतरेय ब्राह्मण ग्रंथाची निर्मिती ज्ञान अर्जित करून केली. स्वत्व टिकवायला शिकविणारी जबाला तसेच केवल भौतिकच नाही तर आध्यात्मिक उन्नतीचा मुलांना उपदेश देणारी मदालसा ही देखील तेजस्वी स्त्री होती.
त्यापुढे म्हणाल्या, चूडाला ही प्राचीन भारतातील अत्यंत तेजस्वी, बुद्धिमान स्त्री होती, जिने आपल्या पतीला राजा शिखिध्वज ला गुरु बनून उपदेश केला. हनुमानाची माता अंजनी तसेच ऋग्वेदातील देवशुनी सरमा या देखील प्रत्यक्ष मानवी नसणाऱ्या तेजस्वी स्त्रिया दैवी स्त्री शक्तीचे प्रतीक आहेत.

