सोरतापवाडी हुंडाबळी प्रकरणाचा पाठपुरावा; ग्रामीण भागातील महिलांच्या तक्रारींची सद्यपरिस्थिती जाणून घेणार
पुणे.दि.३०: सोरतापवाडी (उरुळी कांचन) येथील हुंडाबळी प्रकरणात एका उच्चशिक्षित इंजिनियर विवाहितेने (दि.२४जानेवारी) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या संवेदनशील प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उद्या (दि. ३१) सकाळी ११.३० वाजता उरुळी कांचन पोलीस ठाण्याला भेट देणार आहेत.
डॉ. गोऱ्हे यांनी या प्रकरणाबाबत निवेदन दिले असून, तपासाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासह पुढील कारवाईबाबत पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच, ग्रामीण भागातील महिलांवरील हिंसाचार, कौटुंबिक छळ आणि संबंधित तक्रारी कशा हाताळाव्यात याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी परिसरातील महिला समुपदेशक, सामाजिक कार्यकर्त्या यांनी दुपारी १२ वाजता उरुळी कांचन पोलीस ठाण्यात संवाद साधण्यासाठी जरूर यावे असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. या भेटीद्वारे ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यावर भर देण्यात येणार आहे.

