पुणे-जगभरात भारताची ओळख ही गांधीजींचा देश अशीच आहे. गांधी विचाराला जगभरात मान्यता आणि सन्मान आहे. ते विचार संपवणारांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. गांधी विचारांचे महत्व संपता संपणार नाही असा विश्वास ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केला.
महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त शुक्रवारी सकाळी गांधी भवन, कोथरूड येथे सर्वधर्म प्रार्थना आणि भजन करण्यात आले. त्यानंतर “मानवतेसाठी लढणारा महात्मा” या लेखक अॅड. शंकर निकम लिखित पुस्तकाचे प्रकाशन शीलाताई बाबा आढाव यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार, डॉ. चैत्रा रेडकर, लक्ष्मिकांत देशमुख, अन्वर राजन यावेळी व्यासपीठावर होते. कार्यक्रमाचे संयोजन महाराष्ट्र गांधी स्मारक निधीने केले.
उल्हास पवार म्हणाले की, लंडन येथे मी गेलो होतो . तेथे गांधीजींच्या जीवनावर आधारीत चित्रपटाचे सहा ठिकाणी शो होते ते सर्वच्या सर्व हाऊस फुल्ल होते. असाच अनुभव वॉशिंग्टन येथे देखील आला. तेथे तीन पिढ्या एकत्र बसून हा चित्रपट पहात होते. तेथील लोक गांधीजींच्या देशातून आलेला म्हणून माझ्याशी संवाद साधत होते. आपल्याकडे सहा वेळा गांधीजींच्या हत्येचा प्रयत्न झाला. गांधीजींचे विचार संपविण्याचा अनेकदा प्रयत्न झाला व होत आहे. गांधीजींची हत्या झाली तरीही गांधीजींचे विचार अजूनही मनात, विचारात, आचरणात जिवंत आहेत. त्यांच्या वर असंख्य पुस्तके लिहिली गेली आहेत. अॅड. शंकर निकम यांनी अतिशय बारकाईने गांधी विचारांचा मागोवा घेतला आहे. त्याचे वाचन व चिंतन सर्व वयोगटातील लोकांनी करावे.
डॉ. चैत्रा रेडकर म्हणाल्या की, जात नको पण जात ज्या व्यवसायामुळे नावास आली तो व्यवसाय आणि ते कलाकौशल्य मात्र टिकवलं पाहिजे अशी भूमिका गांधीजींनी घेतली. गांधीजींनी जात निर्मूलनाविषयी महत्वपूर्ण कार्य केले. तेल घाणा कसा चालवायचा त्यातले बारीक ज्ञान हे तेली समाजातील व्यक्तींना आहे, त्याचा उपयोग राष्ट्रनिर्मितीसाठी , देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी होऊ शकतो, मात्र तेली समाजाला वर्षानुवर्षे जातीवरून हिणवलं गेले. त्यामुळे तरुण पिढी आता इतर व्यवसाय, नोकरी कडे वळत आहे, त्यामुळे जात नको पण व्यवसाय टिकवा, असे गांधीजींचे मत होते.
मुद्दाम समाजात द्वेष पसरविण्यासाठी समाजमाध्यमातून केलेला गांधीजींविषयीचा अपप्रचार याला अभ्यासपूर्ण लेख आणि अनुभव याद्वारे नेस्तनाबूत करण्याची गरज आहे.
अॅड. निकम म्हणाले की, गांधीजींनी सत्याग्रह आणि अहिंसेच्या माध्यमातून इंग्रजांवर दबाव आणला. त्यांच्या आंदोलनात प्रत्येक जाती धर्म आणि व्यवसायाचे लोक सहभागी होते.
प्रास्तविक महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त अन्वर राजन यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय देशपांडे यांनी केले तर आभार लक्ष्मीकांत देशमुख यांनी मानले.

