पुणे- ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी ऑटो क्लस्टर थिएटर, चिंचवड, पुणे येथे एका अर्थपूर्ण आणि गौरवशाली पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी महाराष्ट्र शासनाचे माजी मुख्य सचिव जयंतकुमार बनठिया (भा.प्र.से. निवृत्त) तसेच सुरज मांढरे (भा.प्र.से.) कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
या समारंभास माजी सनदी अधिकारी दौलत देसाई व सुनील पाटील, पुढारी वृत्तपत्राचे संचालक मंदार पाटील, तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी सौ. पूनम मेहता व सतीश राऊत यांची मान्यवर उपस्थिती लाभली.
मोहन ठोंबरे (भा.प्र.से. निवृत्त) लिखित ‘A Promise to Myself’ (इंग्रजी) आणि ‘एक वचन : स्वतःला दिलेले’ (मराठी) ही पुस्तके या वेळी प्रकाशित करण्यात आली. ही पुस्तके महाराष्ट्र राज्याच्या सेवेत तीन दशकांहून अधिक काळ विविध जबाबदाऱ्या सांभाळलेल्या एका प्रशासकीय अधिकाऱ्याचा प्रेरणादायी जीवनप्रवास मांडतात.
लेखकांनी उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी तसेच नंतर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी म्हणून काम करताना अनेक महत्त्वाच्या व संवेदनशील जबाबदाऱ्या पार पाडल्या. या पुस्तकांमधून शासनव्यवस्थेकडे केवळ प्रशासकीय यंत्रणा म्हणून नव्हे, तर मानवी मूल्यांवर आधारलेली जबाबदारी म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.
मैदानी पातळीवर निर्णय घेताना येणाऱ्या अडचणी, प्रशासकीय आव्हाने, नैतिक पेचप्रसंग आणि जनतेच्या अपेक्षांशी समतोल राखत केलेले निर्णय—या सर्वांचा सखोल व प्रामाणिक आलेख या पुस्तकांतून उलगडतो. प्रशासन, सार्वजनिक सेवा, तसेच तरुण पिढीसाठी ही पुस्तके मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरतील.ही दोन्ही पुस्तके ए.पी.के. पब्लिशर्स एल.एल.पी., पुणे यांनी प्रकाशित केली आहेत.
मोहन ठोंबरे यांच्या ‘एक वचन : स्वतःला दिलेले’ पुस्तकाचे प्रकाशन
Date:

