पुणे – महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २४ ड मधून विजयी झालेले भाजपचे उमेदवार आणि भाजपच्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीची धुरा खांद्यावर घेतलेले नेते , नगरसेवक गणेश मधुकर बिडकर यांची भाजपच्या सर्व विजयी ११९ नगरसेवकांच्या गटाचे नेते म्हणून निवड झाली आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी याबाबतचे पत्र महापालिका आयुक्त आणि विभागीय आयुक्त यांना दिले आहे.

पुणे महापालिकेत गेल्या सत्रात बिडकर स्वीकृत सदस्य असताना त्यांनी सभागृह नेता म्हणून आपली कार्यकुशलता सिद्ध केली होती . महापौर पदाचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे आणि श्रीनाथ भिमाले यांच्याकडे पहिले जात असताना महापौर पद महिला आरक्षित झाल्याने या दोन्ही नेत्यांची महापौर पदावरील संधी हुकली.आता गेल्या सत्रातील आणि एकूणच महापालिकेच्या राजकारणातील कार्यकुशलता लक्षात घेऊन बिडकर यांना गटनेते करण्यात आले आहे. गटनेते हेच महापालिकेतील सभागृहनेते देखील होतील . येत्या ९ तारखेला महापौर ,उपमहापौर पदाची निवडणूक आणि स्थायी समिती अध्यक्ष पदासह विविध समित्यांच्या निवडणुका घेण्याची तयारी सुरु आहे. या सर्वात नेता म्हणून बिडकर यांची महत्वाची भूमिका राहणार आहे.
कोण आहेत गणेश बिडकर :
गणेश मधुकर बिडकर हे पुणे शहरातील ज्येष्ठ नगरसेवक व भारतीय जनता पार्टीमधील शहरातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत.
वडील स्व. मधुकरराव बिडकर हे पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक व स्थायी समितीचे अध्यक्ष होते.
भारतीय जनता पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन सातत्यपूर्ण आणि यशस्वी राजकीय वाटचाल.
पुणे महानगरपालिका अनुभव–
२००२ ते २०२२ : पुणे महानगरपालिकेचे सभासद.
भाजपासाठी प्रतिकूल मानल्या जाणाऱ्या मतदारसंघात काँग्रेसच्या गटनेत्यास व पुण्याच्या तत्कालीन महापौरांना पराभूत केले.
पूर्व पुण्यात भाजपचा प्रभाव वाढवण्यात महत्त्वाची भूमिका.
महत्त्वाची पदे:
२००९ – २०१० : अध्यक्ष, कसबा पेठ प्रभाग समिती
२०१० – २०११ : अध्यक्ष, शहर सुधारणा समिती
२०११ – २०१२ : अध्यक्ष, स्थायी समिती
२०१४ – २०१७ : गटनेता, भारतीय जनता पार्टी
२०२० – २०२२ : सभागृह नेता, पुणे महानगरपालिका
पक्ष संघटना
गेल्या ३० वर्षांपासून पक्ष संघटनेत सक्रिय.
प्रभाग पातळीपासून शहर पातळीपर्यंत विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या.
भारतीय जनता पार्टीचे शहर सरचिटणीस.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या ‘जनादेश यात्रा’ची प्रमुख जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
अलीकडील यशस्वी जबाबदाऱ्या:
२०२५ : पुणे महानगरपालिका निवडणूक प्रमुख.
२०२६ : पुणे महानगरपालिका निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी.
२०२६ : पुणे महानगरपालिकेत गटनेता व सभागृह नेतेपदी निवड.

