पुणे- खराडी परिसरात पिकअप वाहनाच्या चाकाखाली आल्याने दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.मयूर अमर माळवे (वय 2) असे मृत बालकाचे नाव आहे. राजू मगन ढोले (वय 66, रा. बाळकृष्ण अपार्टमेंट, ढोले-पाटील रस्ता) या पिकअप वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूनम अमर माळवे (वय 25, रा. ढोले पाटील वाडा, खराडी) यांनी खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम माळवे यांचा मुलगा मयूर घरासमोरील मोकळ्या जागेत खेळत होता. ढोले यांचा गोठा याच मोकळ्या जागेत असून, ते दूध वाहतूक करणारे पिकअप वाहन घेऊन तेथे आले होते. खेळत असताना मयूर वाहनाच्या चाकाखाली सापडला आणि गंभीर जखमी झाला.
मयूरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलिस निरीक्षक गोडसे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

