पुणे : येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हवेली जिल्हा परिषद निवडणूक कार्यालयाच्या वतीने मतदान प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व विश्वासार्ह राहावी यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. दुबार मतदानाचा कोणताही प्रकार घडू नये, यासाठी निवडणूक यंत्रणेला सतर्क राहण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
मतदानाच्या दिवशी मतदारांची ओळख काटेकोरपणे तपासण्यात येणार असून मतदार यादीतील नोंद, वैध ओळखपत्राची खातरजमा तसेच बोटावर अमिट शाई लावण्याची प्रक्रिया अत्यंत दक्षतेने राबविण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी व कर्मचारी सतर्क राहून आपली जबाबदारी पार पाडणार आहेत.
संशयास्पद बाबी आढळून आल्यास तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्याचे निर्देश देण्यात आले असून दुबार मतदानाचा प्रयत्न करणाऱ्यांवर निवडणूक कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी निवडणूक अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी मतदारांनी निर्भयपणे, प्रामाणिकपणे व जबाबदारीने मतदान करावे, असे आवाहन केले आहे. तसेच तहसीलदार तृप्ती कोलते, सहाय्यक निवडणूक अधिकारी अर्चना निकम व सचिन आखाडे यांनीही मतदान प्रक्रिया शांततेत व नियमबद्ध पार पडण्यासाठी सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे सांगितले.
लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने सजग भूमिका घ्यावी, असेही निवडणूक कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
दुबार मतदान रोखण्यासाठी कडक उपाययोजना
Date:

