पुणे :हवेली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हवेली येथील निवडणूक कार्यालयातील मनुष्यबळ विभागाने अहोरात्र काम करत निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवली आहे. पारदर्शक, शांततापूर्ण आणि नियोजनबद्ध निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाचे काटेकोर नियोजन करण्यात आले असून प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
हवेली तालुक्यात एकूण २६३ मतदान केंद्रे असून प्रत्येक मतदान केंद्रासाठी शिपाई, पीआरओ (Presiding Officer), मतदान अधिकारी क्रमांक १, २ व ३ अशा पाच सदस्यांची टीम नियुक्त करण्यात आली आहे. या प्रमाणे एकूण २६३ नियमित मतदान टीम्सची रचना करण्यात आली आहे. यासोबतच आकस्मिक परिस्थिती किंवा अनुपस्थितीची शक्यता लक्षात घेऊन रिझर्व्ह टीम्सही तयार ठेवण्यात आल्या असून, रिझर्व्ह धरून एकूण सुमारे ३७० मतदान टीम्सची आखणी पूर्ण झाली आहे.
या व्यापक नियोजनासाठी जवळपास २,००० कर्मचाऱ्यांचे प्रथम टप्प्यातील प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे. प्रशिक्षणादरम्यान मतदान प्रक्रिया, जबाबदाऱ्या, आचारसंहिता, निवडणूक साहित्य हाताळणी तसेच आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उर्वरित रिझर्व्हमधील सुमारे ८०० कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण लवकरच पूर्ण करून त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
संपूर्ण मनुष्यबळ व्यवस्थापनाची जबाबदारी निवडणूक अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडली जात आहे. मनुष्यबळ विभागात सहाय्यक महसूल अधिकारी प्रमोद भांड, भूमेश मसराम, अश्विनी कुलकर्णी, प्रियांका शिंगाडे, सरस्वती पोंदे, स्मिता बगाटे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी समन्वयाने काम करत आहेत. प्रशिक्षण, नियुक्ती, माहिती संकलन व समन्वय अशी सर्व कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी विभागाने विशेष दक्षता घेतली आहे.
हवेली तालुक्यातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी, प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक मनुष्यबळ वेळेवर उपलब्ध व्हावे आणि मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी निवडणूक प्रशासन कटिबद्ध असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
हवेली जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक २६३ मतदान केंद्रांसाठी ३७० टीम्स सज्ज
Date:

