पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतीलाल सुरतवाला यांचे आज पहाटे निधन झाले.
वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ते कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
शांतीलाल सुरतवाला यांची ओळख केवळ एक राजकारणी म्हणून नव्हती, तर ते एक सामाजिक कार्यकर्ते आणि कल्पक प्रशासक म्हणूनही ओळखले जायचे. त्यांच्या निधनामुळे पुणे शहराच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शांतीलाल सुरतवाला यांचा राजकीय प्रवास १९७९ मध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीने सुरू झाला. सिटी पोस्ट वॉर्डातून त्यांनी पहिली निवडणूक लढवली आणि जिंकली. १९७९ ते २००७ या प्रदीर्घ काळात त्यांनी नगरसेवक आणि महापौर म्हणून शहराची सेवा केली..
शरद पवारांचे निकटवर्तीय
शांतीलाल सुरतवाला हे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सुरेश कलमाडी यांचे अत्यंत विश्वासू मानले जात. स्वतःहून कधीही पदाची अपेक्षा न करणाऱ्या सुरतवाला यांना शरद पवारांनी स्वतःहून महापौरपदाची जबाबदारी दिली होती. ते प्रसिद्ध आनंद ऋषीजी ब्लड बँकचे संस्थापक होते. तसेच गणेश मंडळाचे कार्यकर्ते म्हणूनही त्यांचा शहरात मोठा दबदबा होता.अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात आधीच कडकडीत बंद आणि दुखवटा पाळला जात असतानाच, सुरतवाला यांच्या जाण्याने पुणेकरांवर दुहेरी दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एक संयमी, अभ्यासू आणि विकासकामे तडीस नेणारा नेता हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

