पुणे : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी हवेली निवडणूक कार्यालयाच्या स्ट्रॉंग रूममध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) यंत्रांची कमिशनिंग प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी डॉ. यशवंत माने आणि तहसीलदार अर्चना निकम, तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी सचिन आखाडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक अधिकारी किशोर पाटील आणि गजानन किरवले यांच्या सहकार्याने ही प्रक्रिया काटेकोरपणे पार पडली. या प्रक्रियेत, सेक्टर ऑफिसरने नामनिर्देशित केलेल्या प्रत्येक मतदान केंद्रासाठी ईव्हीएम यंत्रांची कार्यक्षमता तपासण्यासाठी प्रत्येक यंत्रावर अभिरूप मतदान (mock poll) घेण्यात आले. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ईव्हीएम यंत्रांवर अभिरूप मतदानाद्वारे यंत्रांची कार्यक्षमता आणि विश्वासाहर्ता तपासण्यात आली

यामध्ये कोणत्याही प्रकारचा तांत्रिक दोष नाही, याची खात्री करण्यात आली आणि यंत्रे शीलबंद करून मतदानासाठी सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. ही सर्व प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार अत्यंत काटेकोरपणे राबवण्यात आली आहे. तसेच, प्रत्येक यंत्राची तपासणी करण्यात येऊन आवश्यक त्या सर्व चाचण्या घेण्यात आल्या. या संपूर्ण प्रक्रियेत राजकीय पक्षांचे प्रतिनिधीही उपस्थित होते, ज्यामुळे प्रक्रिया पारदर्शक राहिली. उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी देखील या प्रक्रियेत सहभागी झाले होते, त्यामुळे सर्व संबंधित पक्षांना यंत्राच्या कार्यक्षमतेबाबत पूर्ण विश्वास प्राप्त झाला आहे. या प्रक्रियेत यंत्रांमध्ये उमेदवारांचे चिन्ह (सिम्बॉल)
अपलोड करण्यात आले. यंत्रांमध्ये चिन्हे तसेच सर्व तांत्रिक घटक योग्य प्रकारे कार्यरत असल्याची खात्री करण्यासाठी हे प्रात्यक्षिक घेण्यात आले. ही तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व यंत्रे शीलबंद करण्यात आली आणि निवडणुकीसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.जिल्हा निवडणूक शाखेने सर्व उमेदवारांना मतदान केंद्रांवरील यंत्रांची यादी त्वरित उपलब्ध करून दिली असून, कोणतीही दिरंगाई न करता यादी वितरणाचे काम वेळेवर पूर्ण केले आहे. यामुळे उमेदवारांना आवश्यक माहिती वेळेवर प्राप्त झाली आहे आणि निवडणूक प्रक्रियेबद्दल त्यांना विश्वासार्हता वाटत आहे. निवडणूक अधिकारी डॉ. माने यांनी याबाबत सांगितले की, “मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता आणि मतदारांचा विश्वास वाढावा यासाठी ही प्रक्रिया अत्यावश्यक आहे. यामुळे आगामी निवडणुकीत मतदारांना सुरक्षित आणि विश्वासार्ह मतदानाचा अनुभव मिळेल.”

