पुणे- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाले. बारामती विमानतळावर त्यांचे विमान लँड होत असतानाच भीषण अपघात झाला आणि होत्याचे नव्हते झाले. विमान लँड करत असताना दृश्यमानता कमी असल्याने अपघात झाल्याचे बोलले जात आहे. परंतु, यावरून आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शंका उपस्थित केली आहे.
सुषमा अंधारे यांनी ट्विट करत म्हटले की, बारामती विमानतळावर कमी दृश्यमानता होती म्हणून अपघात झाला असे अनेकजण अपघाताचे कारण सांगत आहेत. पण खूप दूरच्या सीसीटीव्हीमध्ये विमान घिरट्या घालताना स्पष्ट दिसत होते. जर तिथे धुक्याचे वातावरण असेल तर सीसीटीव्हीतील घिरट्या घालतानाचे फुटेज इतके स्पष्ट कसे? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
पुढे सुषमा अंधारे म्हणाल्या, काल लगेच यावर बोलणे संकेताला धरून नसले तरी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केलेले प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. ही चौकशी झालीच पाहिजे किंवा ही चौकशी आम्ही अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा करू असे सत्ताधाऱ्यांमधला एकही नेता ठामपणे का बोलत नाही? अजितदादांच्या नंतर पक्षातील जेष्ठता क्रम असणारे प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ किंवा दिलीप वळसे पाटील यांनी मौन का बाळगले आहे? साहेबांचे राष्ट्रवादीतले ही ज्येष्ठ नेते यावर का बोलत नाहीत? असे प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे पत्र पाठवून या अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार केंद्रीय उड्डाण मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांनी चौकशी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार याची चौकशी एएआयबी संस्थेकडून तपास सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

