पुणे : आठव्या विश्वनाथ स्पोर्ट मीट (व्हीएसएम–२०२६) या वर्षातील सर्वांत मोठ्या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन/आंतरविद्यापीठीय क्रीडा स्पर्धेत यजमान एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ (एमआयटी-एडीटी), विश्वराजबाग, पुणेच्या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत तब्बल १० सुवर्ण व २४ रौप्यपदकांसह पदकतालिकेत वर्चस्व राखत स्पर्धेचे विजेतेपद कायम ठेवले.
एमआयटी-एडीटी विद्यापीठानंतर मुंबईतील बी.के. बिर्ला रात्र महाविद्यालयाच्या संघाने एकूण ५ सुवर्ण व ४ रौप्य पदकांसह दुसरा क्रमांक पटकाविला, तर पुण्यातील एम.ई.एस. गरवारे महाविद्यालयाने ५ सुवर्ण व ३ रौप्य पदकांसह तिसरा क्रमांक मिळविला. एमआयटी-एडीटी विद्यापीठाने गतवर्षीही विजेतेपद पटकाविले होते. भारत सरकारच्या फिट इंडिया चळवळीच्या प्रचारासाठी क्रीडा भारती व बँक ऑफ इंडिया यांच्या प्रमुख सहयोगाने ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली.
तब्बल १५ क्रीडा प्रकारांत, १५०हून अधिक शिक्षण संस्थांमधील ६,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागाने झालेल्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण पद्मश्री व अर्जुन पुरस्कारप्राप्त तसेच रोईंगमधील आशियाई सुवर्णपदक विजेते कॅप्टन बजरंग लाल ताखर (व्हीएसएम), ऑलिम्पियन व अर्जुन पुरस्कार विजेते जलतरणपटू विरधवल खाडे, तसेच मेजर ध्यानचंद पुरस्कारप्राप्त रोवर स्मिता शिरोळे-यादव, विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र-कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुराज भोयार, क्रीडा संचालक प्रा. पद्माकर फड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांना १० लाख रुपयांपर्यंत रोख पारितोषिके, पदके व करंडक प्रदान करण्यात आले.
बॅडमिंटन पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात डी.वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने यजमान एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा ३–२ असा पराभव करून सुवर्णपदक पटकाविले. महिला गटात विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा २–१ अशा फरकाने पराभव करत सुवर्णपदक जिंकले.
बुद्धिबळ पुरुष गटात पार्थ बढेकरच्या कामगिरीच्या जोरावर एमआयटी विश्वशांती विद्यापीठाने यजमान एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा, तर महिलांतही एमआयटी विश्वशांती विद्यापीठाने यजमान संघाचा पराभव करून सुवर्णपदक पटकाविले.
बास्केटबॉल पुरुषांच्या अंतिम सामन्यात एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या संघाने एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचा, तर महिलांत एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या संघाने एमआयटी-एडीटी संघाचा पराभव करत सुवर्ण कामगिरीची नोंद केली.
फुटबॉल स्पर्धेच्या पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात स्पायसर विद्यापीठाने नेस वाडिया महाविद्यालय, पुणे यांचा ३–२ असा पराभव केला. महिलांत एमआयटी-एडीटी विद्यापीठाने एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचा ३–१ असा पराभव केला. यामध्ये अंजली कामठे हिला सर्वोत्तम खेळाडू घोषित करण्यात आले.
कबड्डी पुरुष गटात भारती विद्यापीठाने एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा, तर महिलांत सरहद महाविद्यालयाने एमआयटी-एडीटी संघाचा पराभव करत सुवर्ण कामगिरी केली. विश्वजीत सरवले व ज्ञानेश्वर खळदकर हे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले.
अत्यंत रोमांचक ठरलेल्या महिला खो-खो अंतिम सामन्यात एम.ई.एस. गरवारे महाविद्यालयाने डी.वाय. पाटील विद्यापीठ, अंबी यांचा, तर पुरुष गटात एमआयटी-एडीटी विद्यापीठाने प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, निगडी यांचा पराभव केला. श्वेता नवले व निखिल परांदे हे सर्वोत्तम खेळाडू ठरले.
टेनिसच्या दोन्ही गटांत एनडीए, खडकवासला व एमआयटी-एडीटी विद्यापीठाने विजेतेपद पटकाविले, तर व्हॉलीबॉलमध्ये भारती विद्यापीठ, पुणे आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठाने सुवर्ण कामगिरीची नोंद केली. वॉटर पोलो प्रकारात पुरुष गटात मुंबई विद्यापीठ, तर महिलांत एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे वर्चस्व राहिले.
भारती विद्यापीठाकडे क्रिकेट करंडक
स्पर्धेतील सर्वांत रोमांचक ठरलेल्या क्रिकेट अंतिम सामन्यात भारती विद्यापीठाने निकमार विद्यापीठावर ७४ धावांनी विजय मिळवत विजेतेपद पटकाविले. भारती विद्यापीठाच्या ओम खटावकरने १० चौकार व ३ षटकारांच्या मदतीने अवघ्या ५४ चेंडूंमध्ये नाबाद ९२ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना भारती विद्यापीठाने ७ बाद २३२ धावा, तर प्रत्युत्तरात निकमार विद्यापीठाने ७ बाद १५८ धावा केल्या. महिलांत अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाने एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा पराभव करत करंडक पटकाविला.

