पुणे- राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांनी थेट सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्याची मागणी करत अजित पवार यांच्या पश्चात निर्माण झालेल्या नेतृत्वाच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. झिरवाळ यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या हालचालींना वेग येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. मात्र, ही भेट नेमकी कशाबद्दल होती, याची माहिती अजून पुढे आली नाही.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी बारामतीत झालेल्या भीषण विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले होते. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी बारामतीत हजारोंचा जनसागर उसळला होता. सर्वसामान्य नागरिकांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत, प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू होते. आपल्या लाडक्या ‘दादा’ला अखेरचा निरोप देताना संपूर्ण बारामती भावुक झाली होती.
अजित पवार यांच्या पार्थिवाला त्यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी मुखाग्नी दिला. चिता पेटताना उपस्थितांची मने सुन्न झाली होती. अंत्यसंस्काराच्या संपूर्ण विधी दरम्यान पार्थ पवार आणि जय पवार हेच प्रमुखपणे समोर उभे राहून सर्व मान्यवरांच्या भेटी घेत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि पवार कुटुंबातील इतर सदस्य खाली बसून होते. त्यामुळे अनेकांच्या नजरा पार्थ आणि जय पवार यांच्यावर खिळल्या होत्या. अजित पवार यांचे राजकीय वारसदार म्हणून हे दोघे पुढे येणार, असे संकेत यातून मिळाल्याची चर्चा सुरू झाली.
अजित पवार हे केवळ राज्याचे उपमुख्यमंत्री नव्हते, तर ते अर्थमंत्री, बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा होते. त्यांच्या अचानक जाण्यामुळे एकाच वेळी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे या जागा कोण भरणार, पक्षाची धुरा कोण सांभाळणार आणि सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय असेल, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या अंत्यसंस्कारानंतर लगेचच नरहरी झिरवळ यांनी केलेल्या वक्तव्याने या चर्चांना अधिकच धार दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, अजित पवार यांच्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे. झिरवाळ यांच्या या मागणीने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी पक्षाने तातडीने निर्णय घ्यावा, असा संकेत या विधानातून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अंत्यसंस्काराच्या दिवशीच अशी मागणी समोर आल्यामुळे तिचे राजकीय महत्त्व अधिक वाढले आहे.
पवार कुटुंबीय हे कायमच राजकारणात प्रॅक्टिकल आणि दूरदृष्टीने विचार करणारे मानले गेले आहेत. परिस्थितीची गरज, पक्षाची दिशा आणि सत्तासमीकरणे ओळखून निर्णय घेण्याची परंपरा या कुटुंबाची राहिली आहे. त्यामुळे एका बाजूला अजित पवार यांच्या जाण्याचे दु:ख असले, तरी दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही निर्नायकी अवस्था निर्माण होऊ नये, यासाठी हालचाली सुरू झाल्याचे चित्र आहे. झिरवळ यांच्या मागणीमागेही हाच राजकीय व्यवहार्यतेचा विचार असल्याचे बोलले जात आहे.
अजित पवार यांच्या अंत्यविधीत दिसलेली मांडणी, पार्थ आणि जय पवार यांची सक्रिय उपस्थिती आणि त्यानंतर लगेच सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा, या सर्व घटनांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील नेतृत्वाबाबत संकेत दिले आहेत. पक्षात नेतृत्वाची धुरा कुणाकडे जाणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, उपमुख्यमंत्रीपदासाठी नेमका कोणता चेहरा पुढे येणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
अजित पवार यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे हे राष्ट्रवादी काँग्रेससमोरील मोठे आव्हान आहे. झिरवाळ यांच्या विधानामुळे हे आव्हान अधिक ठळकपणे समोर आले आहे. येत्या काही दिवसांत पक्षांतर्गत बैठकांमध्ये आणि सत्ताधारी आघाडीत यावर सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसची दिशा, नेतृत्व आणि सत्तेतील भूमिका काय असेल, यावरच राज्याच्या राजकारणाचे पुढचे चित्र ठरणार आहे.

