पुणे-काल सकाळची वेळ. अजित पवारांच्या फार्महाऊसवर दिवस नेहमीसारखाच सुरू झाला होता. सकाळची शांतता, रोजची दिनचर्या आणि टीव्ही सुरू असलेली बैठक, कुणालाही कल्पना नव्हती की काही क्षणांतच या घरावर दुःखाचा डोंगर कोसळणार आहे. अजित पवार यांच्या आई आशाताई पवार सकाळच्या वेळेत नेहमीप्रमाणे टीव्ही पाहत बसल्या होत्या. नाश्त्याची तयारी सुरू होती. वातावरणात कुठलाही तणाव नव्हता. मात्र, टीव्ही स्क्रीनवर अचानक एक बातमी झळकली आणि त्या शांततेला क्षणार्धात तडा गेला.
टीव्हीवर विमान अपघाताची बातमी दिसताच आशाताईंनी लगेच प्रश्न विचारला, अरे, दादांचा अपघात झाला आहे का? त्यांच्या आवाजात काळजी होती, पण अजूनही विश्वास नव्हता. सुरुवातीला त्यांनाही वाटत होतं की किरकोळ अपघात असेल, दादांना फारसं काही झालं नसेल. फार्महाऊसमध्ये उपस्थित असलेले कर्मचारी आणि कुटुंबातील लोक मात्र त्या क्षणी पूर्णपणे हादरले होते. समोर दिसणाऱ्या बातम्या आणि आतल्या भीतीमध्ये मोठा संघर्ष सुरू झाला, आईंना सत्य कसं सांगायचं?
थोड्याच वेळात टीव्हीवर पुढील अपडेट्स येऊ लागल्या. बारामतीत रुग्णालयात नेल्याची माहिती झळकताच उपस्थितांची धावपळ सुरू झाली. आशाताईंना आणखी धक्का बसू नये म्हणून फार्महाऊसमधील टीव्हीची केबल काढण्यात आली. टीव्ही बंद पडलाय, असं सांगण्यात आलं. त्यांचा मोबाईल फोनही फ्लाइट मोडवर टाकण्यात आला. सगळे जण एकच प्रयत्न करत होते, आईंना काही वेळ तरी या कटू वास्तवापासून दूर ठेवायचं.
मात्र, आईचं मन कुठे थांबणार होतं? दादांना भेटायला जाऊया, असं म्हणत त्या स्वतः चालतच फार्महाऊसच्या बाहेर निघाल्या. गाडीबद्दल विचारल्यावर ड्रायव्हरने गाडी बंद असल्याचं सांगितलं. तरीही त्या ऐकायला तयार नव्हत्या. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता, डोळ्यांत प्रश्न आणि मनात अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. उपस्थित सगळे जण स्तब्ध झाले होते. कोणालाच शब्द सुचत नव्हते.
शेवटी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून नाईलाजाने आशाताईंना बारामती येथील बंगल्यावर नेण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेतानाही सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकत होता. एकीकडे सत्य दडपण्याचा प्रयत्न, तर दुसरीकडे आईच्या नजरेतून निसटत चाललेली शंका, हा संघर्ष फार्महाऊसमध्ये उपस्थित प्रत्येकाच्या मनात सुरू होता. हा प्रसंग पाहताना अनेकांच्या डोळ्यांत पाणी तरळत होतं.
हा केवळ एका राजकीय नेत्याचा अपघात नव्हता, तर एका आईसाठी तो तिच्या आयुष्याचा सर्वात कठीण क्षण होता. फार्महाऊसवर घडलेला हा प्रसंग आजही अनेकांच्या काळजात घर करून बसला आहे. अजित पवारांच्या जाण्याने राज्य हादरलं, पण त्या सकाळी फार्महाऊसवर जी शांतता तुटली, ती कधीच पूर्वीसारखी होणार नाही, असं तिथे उपस्थित असलेले लोक सांगतात.

