पुणे-राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज दुपारी १२:१५ वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शोकाकुल वातावरणात आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्राच्या राजकारणातील एका झंजावाती पर्वाचा आज अंत झाला. त्यांचे सुपुत्र पार्थ आणि जय पवार यांनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला, तेव्हा उपस्थित असलेल्या हजारो समर्थकांचे आणि कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले होते.महाराष्ट्र पोलिस दलातर्फे हवेत फैरी झाडून आणि बिगुल वाजवून अजित पवारांना अखेरची मानवंदना देण्यात आली.
अजितदादांना निरोप देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण मंत्रिमंडळांसह सर्वच पक्षांचे नेते उपस्थित होते.
त्याआधी, अंत्ययात्रेत हजारो लोक उपस्थित होते. बारामतीचे रस्ते जाम झाले होते. गुरुवारी सकाळी अजित पवार यांचे पार्थिव त्यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी नेण्यात आले होते.बारामती येथे बुधवारी सकाळी 8.46 वाजता झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार (66 वर्षे 6 महिने 6 दिवस) यांचे निधन झाले. त्यांच्यासोबत वैमानिक सुमीत कपूर, सहवैमानिक शांभवी पाठक, अंगरक्षक विदीप जाधव आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी यादव होते. त्यातील एकही जण वाचू शकला नाही.
भल्या पहाटे उठून रात्री उशिरापर्यंत जनसामान्यांच्या कामात स्वतःला वाहून घेणारे अजित पवार आज बारामतीच्या मातीत चिरनिद्रेत विसावले. . त्यांच्या निधनामुळे दादा या शब्दाच्या वकुबाला जागणारा नेता महाराष्ट्राने गमावला आहे.
बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात असंख्य भावभावनांच्या हिंदोळ्यांवर अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ व जय पवार या त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी हजारोंच्या जनसमुदायाने अजित पवार अमर रहेचा जयघोष करत आपल्या लाडक्या दादांना भावपूर्ण निरोप दिला. यावेळी काटेवाडीपासून विद्या प्रतिष्ठानपर्यंत महिलांसह कार्यकर्त्यांनी केलेला आक्रोश अजितदादांवरील अखंड प्रेमाची साक्ष देत होता. अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात एक चबुतरा उभारण्यात आला होता. या चबुतऱ्यावर पवार कुटुंबीयांसह राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
त्याच्या शेजारील मंडपात शरद पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप अध्यक्ष नितीन नबीन, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, शाहू महाराज छत्रपती, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक लहानथोर नेते उपस्थित होते.
उल्लेखनीय बाब म्हणजे अजित पवार राज्याच्या राजकीय वर्तुळात कामाचा माणूस म्हणून परिचित होते. ते भल्या पहाटे उठून आपल्या कामाला सुरुवात करायचे. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत जनतेच्या समस्या सोडवत राहायचे. राज्यातील जनता त्यांच्याकडे केवळ एका नेता म्हणून नव्हे तर आपला आधार, आपला दादा म्हणून काम पाहत होते. राज्याच्या राजकारणात मागील साडेचार दशकांपासून त्यांनी आपला शब्द ‘खरा’ करून दाखवला. त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्काराला आज आबालवृद्धांपासून महिलांपर्यंत हजारोंचा जनसमुदाय जमला होता.

