मुंबई, दि. २८ :
राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माझे मार्गदर्शक आणि कुटूंबप्रमुख असलेले अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी माझ्यासाठी असह्य वेदना देणारी आहे. आज महाराष्ट्राने केवळ एक अनुभवी नेता नाही, तर जनतेशी थेट संवाद साधणारा, विकासालाच आपला धर्म मानणारा एक कर्तव्यदक्ष लोकनेता गमावला आहे. ही वेदना कुटुंबातली आहे…आणि हे दुःख शब्दांच्या पलीकडचं आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. पवार कुटुंबीयांना आणि आम्हा सर्वांना हे दुःख सहन करण्याची ताकद देवो, अशा शब्दात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भावपूर्ण श्रध्दांजली व्यक्त केली.
व्यक्त व्हायला शब्द अपुरे पडत आहेत. एखादा नेता नाही, तर घरातला माणूस हरपल्यासारखं वाटत आहे. अजितदादा पवार म्हणजे आमच्यासाठी केवळ नेतेच नव्हते तर ते आधार होते, मार्गदर्शक होते, कठीण वेळी पाठीशी उभं राहणारं कुटुंबातलं माणूस होते. आज त्यांच्या जाण्याने मनात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती शब्दांत मांडणं कठीण आहे. नेहमी धीर देणारा, “मी आहे” असं सांगणारा आवाज आज कायमचा शांत झाला आहे.
अजितदादांचे जाणं ही माझ्या वैयक्तिक आयुष्यातील फार मोठी हानी आहे. माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनाची सुरुवातच अजितदादांच्या सहवासातून झाली. त्यामुळे माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर दादांचा आधार, मार्गदर्शन आणि आशीर्वाद मला लाभला. माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांना त्यांनी उभं केलं, घडवलं, विश्वास दिला. कार्यकर्त्यापासून जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष, आमदार आणि तीन वेळा मंत्री होण्यापर्यंतचा माझा प्रवास दादांच्या पाठबळामुळेच शक्य झाला.
गेल्या चार दशकांत त्यांनी लाखो कार्यकर्त्यांना ताकद दिली. अजितदादांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. फक्त विकास आणि सर्वसामान्य माणूस हे त्यांचं व्हिजन नेहमी स्पष्ट होतं. रोखठोक, स्पष्ट राहून हीच विकासाची भूमिका घेत अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी सामान्य नागरिकांसाठी काम केलं. महाराष्ट्राच्या आणि सर्वसामान्यांसाठी विकासासाठी पहाटे ५ वाजल्यापासून कामाला सुरुवात करुन रात्री ऊशीरापर्यंत हा नेता धावत होता.
आजही विश्वास बसत नाही की अजितदादा आपल्यात नाहीत. आज बारामती तालुक्यात त्यांच्या जाहीर सभा नियोजित होत्या. मुंबईहून बारामतीकडे येत असताना विमानाच्या लँडिंगदरम्यान झालेल्या दुर्दैवी अपघातात त्यांचे निधन झाले, ही घटना मनाला खोलवर हादरवून टाकणारी आहे.
अजितदादांसोबतच्या असंख्य आठवणी आजही डोळ्यांसमोर तरळत आहेत. पिंपरी-चिंचवड आणि बारामतीसारखी रोल मॉडेल शहरं उभारताना त्यांनी विकासाची एक वेगळीच दिशा दिली. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक सहा वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवण्याचा विक्रम त्यांनी नोंदवला होता. त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सर्वाधिक ११ वेळा मांडला. यासोबतच सिंचन, ऊर्जा आणि वित्त अशा महत्त्वाच्या खात्यांचा कार्यभार सांभाळताना सर्वोत्तम कामगिरी केली होती. असंख्य संस्था, शासकीय इमारती आणि विकासकामांमधून त्यांची दूरदृष्टी कायम जिवंत राहणार आहे. दादा आज आपल्यात नसले, तरी प्रत्येक विकासकामाकडे पाहताना त्यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.
आपल्यासोबत असणारा, प्रेरणा देणारा, कामातून नेतृत्व शिकवणारा सहकारी गमावणं म्हणजे आयुष्यात निर्माण झालेली प्रचंड पोकळी आहे. प्रभावी, कणखर आणि निर्णायक नेतृत्व म्हणून अजित पवार यांची ओळख होती. त्यांच्या सोबत काम करणं म्हणजे राजकारणात शिकण्याचा एक अखंड प्रवास होता. अविरत कामात स्वतःला झोकून देत लोकांची कामं करण्याचा त्यांचा हातखंडा होता. मातीतील माणसाशी जोडलेला हा लोकनेता आज आपल्यातून निघून गेला आहे, ही कल्पनाच असह्य आहे.
हा शोकसंदेश लिहिताना अंतःकरणात अपार वेदना होत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. राज्यातील गोरगरीब, तळागाळातील जनतेसाठी झटणारा नेता आज महाराष्ट्राने गमावला आहे.
या दुःखद घटनेने पवार कुटुंबीयांवर आलेल्या आघातातून त्यांना सावरण्याची शक्ती देव मिळो, हीच प्रार्थना करतो. या महान लोकनेत्याला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
दत्तात्रय भरणे
कृषी मंत्री, महाराष्ट्र राज्य

