लाडक्या बहिणींचे हक्काचे दादा
पुणे-महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त समजताच सामान्य कार्यकर्त्यांपासून ते मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांपर्यंत सर्वांनाच मोठा धक्का बसला असून, संपूर्ण राजकीय वर्तुळातून तीव्र शोक व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक दिग्गज नेते आणि नागरिकांनी आपल्या लाडक्या दादांच्या आठवणींना उजाळा दिला आहे, तर अनेकांनी त्यांच्याशी झालेल्या शेवटच्या संवादाचे हृदयद्रावक अनुभव कथन केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत आपल्या भावनांना वाट मोकळी केली आहे.
आमच्या राष्ट्रवादी परिवारावर आज दुःखाचा डोंगर कोसळला, दादा नावाच्या व्यक्तीच्या सावलीत असणाऱ्या आम्हा सर्वांना काळाने पोरक केलं. आमच्या डोक्यावरील आधाराची आणि मायेची सावलीच हिरावून घेतली, अशा शब्दांत रुपाली चाकणकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
रूपाली चाकणकर पुढे म्हणाल्या, सूर्याच्या साक्षीने दादांचे काम सुरू व्हायचे काम घेऊन येणाऱ्या प्रत्येक माणसाला दादा आपले काम करतील हा विश्वास वाटायचा हीच दादांची ओळख होती. दादा स्पष्टपणे जितके बोलायचे त्याच्या कैक पटीने जास्त त्यांच्या मनात प्रत्येकाबद्दल आदर आणि आपुलकी असायची.
आम्हा सर्वांना दादांची आदरयुक्त भीती होती, संघटनेच्या कामकाजात देखील ते अतिशय स्पष्टपणे सर्व गोष्टी समजावून सांगायचे. शेवटच्या घटकांला केंद्रस्थानी ठेवून आपल्याला पक्ष संघटन मजबूत करायचे आहे, महिलांना राजकारणात जास्तीत जास्त प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यायची आहे असे सांगणारे लाडक्या बहिणींचे हक्काचे दादा होते. आजच्या घटनेनंतर खरोखर व्यक्त होण्यासारखे काहीच उरलेले नाही, आमचा सर्व राष्ट्रवादी परिवार आमचे आदर्श असलेल्या नेतृत्वाला पोरका झाला असल्याचे रूपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.
अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी 11 वाजता बारामतीत अंत्यसंस्कार होणार आहेत. अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार, काका शरद पवार, अजित पवारांचे दोन्ही मुले आणि बहीण सुप्रिया सुळे बारामतीत दाखल झाले आहेत. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उद्या अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामतीत येणार आहेत.

