मुंबई, दि. २८ जानेवारी २०२६
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अकाली निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक व सुन्न करणारी आहे. स्पष्टवक्तेपणा, प्रशासनावर मजबूत पकड, जनतेच्या प्रश्नांची सखोल जाण आणि ते सोडवण्याची क्षमता असलेल्या अजित दादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने धडाडीचे कर्तबगार व लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या.
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अजित दादा पवार यांना राजकारणाचे बाळकडू त्यांचे काका, ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्याकडून मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत अजित दादांनी राजकारणात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. कामाच्या बाबतीत ते अत्यंत स्पष्ट, वक्तशीर, कणखर आणि निर्णयक्षम भूमिका घेत असत. कोणत्याही पक्षातील कार्यकर्ता असो, त्याच्या मदतीसाठी ते सदैव तत्पर असत.
आपल्या राजकीय कारकिर्दीत अजित पवार यांनी आमदार, खासदार, विविध खात्यांचे मंत्री तसेच उपमुख्यमंत्री अशा अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या आणि प्रत्येक पदाला त्यांनी पूर्ण न्याय दिला. राजकारणासोबतच सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, सहकार, कला व क्रीडा क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. बारामतीसह पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे करून त्यांनी या शहराचा चेहरामोहरा बदलून दाखवला. सर्वसामान्य लोकांची कामे झाली पाहिजेत, हीच त्यांची कायम भूमिका होती. शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता.
अजित दादा पवार यांची प्रशासनावर मजबूत पकड होती. राज्याचे नेतृत्व करत असताना त्यांनी संस्थात्मक बांधणी केली, नेतृत्वाची पुढील पिढी घडवली आणि सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण विकासावर विशेष भर दिला. विरोधी पक्षातील नेत्यांशीही त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी राजकीय हानी झाली आहे. स्व.विलासराव जी देशमुख, गोपीनाथ जी मुंडे यांच्याप्रमाणेच अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.
अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पवार कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

