करतो, बघतो, पाहतो, हे शब्दच अजित पवारांच्या डिक्शनरीत नव्हते
मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मला माझा मोठा भाऊ हरपल्याचे दुःख झाले आहे, अशी भावना सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. अजित पवार वयाने मोठे होते. आम्ही राजकारणात एक टीम म्हणून काम करत असलो तरी, एक मोठा भाऊ हरपल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली आहे. हे डोंगराएवढे दुःख पचवण्याची क्षमता ईश्वराने त्यांना प्रदान करावी, असे ते म्हणाले.
एकनाथ शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, अजित पवार चुकीला चूक म्हणत होते. ते मनाने अतिशय निर्मळ होते. त्याचा अनुभव मी स्वतः घेतला. त्यांच्यासोबत मी मंत्रिमंडळातही काम केले. मी मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा अजित पवारांनी या योजनेसाठी आर्थिक तरतूद करण्याचे उत्कृष्ट काम केले. त्याचा अनुभव मला आहे. एकदा करायचे ठरवले की ते करायचेच. करतो, बघतो, पाहतो असे शब्द त्यांच्या डिक्शनरीत नव्हते. होत नसेल तर होणार नाही असे ते ठामपणे सांगायचे.
असा स्पष्टवक्तेपणा या महाराष्ट्राने पाहिला. मी असेन. मुख्यमंत्री असतील. अजित पवार असतील. आम्ही टिम म्हणून काम केले. आमच्या कामाच्या वेळाही वेगवेगळ्या होत्या. मी रात्री उशिरापर्यंत काम करतो. दादा पहाटे लवकर उठून कामाला लागत होते. देवेंद्र दिवसभर काम करतात.
ते पुढे म्हणाले, अजित पवारांनी पहाटे 6 वा. वेळ दिल्याचे अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी पाहिले आहे. अतिशय वेळेचे महत्त्व व वेळेचे भान ठेवणारा नेता हरवलेला आहे. खरे म्हणजे काल परवाच सरन्यायाधीशांसोबतच्या एका कार्यक्रमात आमची भेट झाली. ते येण्यापूर्वी आम्ही तिथेच एका चेंबरमध्ये बसलो होतो. त्यावेळी झालेल्या चर्चा, गप्पा, गोष्टी आज मला त्यांच्या अपघाताची बातमी कळली तेव्हा डोळ्यासमोरून गेल्या.
अजित पवार माझ्यापेक्षा वयाने व राजकारणाने मोठे होते. त्यांना राज्यातील अनेक विषयांचा गाढा अभ्यास होता. त्यांनी अनेक विषय हाताळले होते. त्याचा राज्याला फायदा होत होता. मंत्रिमंडळात देखील ज्यावेळी काही विषय यायचे त्यावेळी आपल्य राज्याची आर्थिक परिस्थिती अशी अशी आहे, आपल्या सर्वांना काटकसर करावी लागेल असे ते निर्भिडपणे सांगत होते. शिस्तिचा नेता म्हणूनही त्यांना अनुभवले. त्यामुळे त्यांच्या जाण्याने केवळ पवार कुटुंबीयांचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.
अजित पवार माझ्यापेक्षा वयाने मोठे होते. आमच्यात गत काही वर्षांपासून फार जवळीक निर्माण झाली होती. आम्ही राजकारणात एक टीम म्हणून काम करत असलो तरी सुद्धा एक मोठा भाऊ हरपल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली आहे. मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. मनात दुःखाच्या फार भावना आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना हे डोंगराएवढे दुःख पचवण्याची क्षमता ईश्वराने त्यांना प्रदान करावी. हे कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे झालेले नुकसान आहे. मी व मुख्यमंत्री आम्ही बारामतीला जात आहोत.
आम्ही सरकार म्हणून जे काही निर्णय घ्यायचो ते मिळूनच घ्यायचो. एखादी सूचना आली की, त्याला तिघांनी बळ देऊन ते पूर्ण करायचो. अजित पवार कधीकधी असेही म्हणायचे की, नव्या योजनांमुळे आपल्याला काटकसर करावी लागेल. पण जेव्हा काही निर्णय आपल्याला जेव्हा घ्यावेच लागत होते तेव्हा ते मागे हटत नव्हते, याचा अनुभवही आम्ही घेतला आहे.
या अपघातात आमच्या सहकाऱ्याचा मृत्यू झाला. 6 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे या विमान अपघाताची चौकशी झाली पाहिजे. ती नक्कीच होईल. कारण, यापुढेही अशा प्रकारचे अपघात होता कामा नये यासाठी हे गरजेचे आहे. त्यासाठी त्याची चौकशीही होईल.

