पुणे- बुधवारी सकाळी 8.30 च्या सुमारास अवघ्या महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती विमानतळालगत झालेल्या विमान अपघातात दुःखद निधन झाले. ते बारामती येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी येत होते. विमान उतरत असतानाच हा दुर्दैवी अपघात झाला आणि अवघ्या महाराष्ट्राचा दादा आपल्या बारामतीच्या मातीतच काळाच्या कुशीत विसावला. त्यांच्या निधनामुळे अवघ्या महाराष्ट्रावर दुःखाची शोककळा पसरली आहे.
अजित अनंतराव पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातील देवळाली प्रवरा गावात झाला. त्यांचे वडील अनंतराव गोविंदराव पवार सुरुवातीला मुंबईतील राजकमल स्टुडिओमध्ये काम करत होते. त्यांच्यावर कौटुंबीक जबाबदारी लवकर आली. अजित पवारांचे शालेय शिक्षण देवळाली प्रवरा येथेच पूर्ण झाले. त्यांनी बारामती येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हायस्कूलमधून दहावी (एसएससी) उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला. परंतु वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाची जबाबदार खांद्यावर आल्यामुळे त्यांना शिक्षण सोडावे लागले. त्यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात शिक्षण सुरू केले, परंतु त्यांची अंतिम पदवी पूर्ण केली नाही. एकूणच, त्यांचे औपचारिक शिक्षण फारच मर्यादित झाले. पण शेतकरी, सहकारी संस्था आणि स्थानिक समस्यांची सखोल समज यामुळे अल्पावधीतच त्यांनी आपल्या कार्याची अमिट छाप समाजमनावर सोडली.
अजित पवारांनी सहकार, शेती व ग्रामीण प्रश्नांमधून राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी आपले चुलते शरद पवारांच्या नेतृत्वात बारामती परिसरात संघटनात्मक कामातून आपल्या नेतृत्वाची चुनूक दाखवली. त्यामुळे लवकरच राज्य पातळीवर एक प्रभावी नेता म्हणून त्यांचा उदय झाला.
अजित पवार 1982 मध्ये पुण्यातील एका सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून आले. यामुळे त्यांच्या सक्रिय राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. त्यांचे काका शरद पवार यांच्या निगराणीखाली त्यांनी झपाट्याने प्रगती केली. अजित पवार पहिल्यांदा 1991 मध्ये बारामती येथून लोकसभेचे खासदार झाले, परंतु त्यानंतर त्यांनी शरद पवारांसाठी ही जागा सोडली. त्याच वर्षी ते बारामती येथून आमदार झाले आणि त्यानंतर 1995, 1999, 2004, 2009, 2014, 2019 आणि 2024 मध्ये सलग विजयी झाले. त्यांनी सिंचन, वित्त, कृषी आणि ग्रामीण विकास अशी महत्त्वाची खाती सांभाळली. त्यांनी महाराष्ट्राचे अनेक वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आणि डिसेंबर 2024 पासून देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये पुन्हा काम केले. ते नियमितपणे सार्वजनिक सभा घेत असत आणि त्यांच्या जलद निर्णय घेण्याबद्दल प्रसिद्ध होते. अजित पवार यांचे 1985 साली महाराष्ट्राचे माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या कन्या सुनेत्रा पवार यांच्याशी लग्न झाले. त्यांना जय आणि पार्थ ही दोन मुले आहेत. पार्थ राजकारणातही सक्रिय आहे.
संस्थात्मक व सामाजिक भूमिका
अजित पवारांनी 1991 पासून आतापर्यंत उपमुख्यमंत्री, वित्त नियोजन, ऊर्जा, जलसंपदा, ग्रामविकास आदी आदी विविध पदे भूषवली. ते बारामती विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त होते, त्यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट पुणे, रयत शिक्षण संस्था सातारा, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, महानंद व महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ आदी विविध संस्थांवर ते अध्यक्ष ते सदस्य म्हणून कार्यरत होते. या सर्व संस्थांवर त्यांनी आपल्या कामाची छापही पाडली होती.

