पुणे-सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण बारामती शहर सुन्न झाले आहे. आपल्य लाडक्या नेत्यच्या मृत्यूमुळे बारामतीकरांच्या काळजाचा ठोका चुकला असून, शहरात अत्यंत हृदयद्राकव व विदारक दृश्य दिसून येत आहे. येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून, आपल्या नेत्यासाठी अनेकजण ढसाढसा रडताना दिसत आहेत.
अजित पवारांच्या निधनामुळे बारामतीमधील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने स्वतःहून बंद केली आहेत. आजूबाजूच्या गावातील हजारो नागरीक व कार्यकर्ते बारामती शहराच्या दिशेने येत आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांचा मोठा ताफा जमा झाले असून, आमचे दादा आम्हाला परत द्या, अशा आर्त हाका मारताना घाय मोकलून रडताना दिसत आहेत. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात विमानाचे प्रचंड नुकसान झाले आहे. घटनास्थळावरील अजित पवारांसह सर्वांचेच मृतदेह पुढील सोपस्कारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलेत. या अपघातामुळे मृतदेहांची अवस्था एवढी वाईट झाली आहे की, त्यांची अद्याप ओळख पटू शकली नाही.
आम्ही तांत्रिक तपासणी व ओळख पटवण्याची प्रक्रिया वेगाने करत आहोत, असे गिल यांनी स्पष्ट केले. सध्या बारामतीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नसला तरी लोकांच्या मनातील भावना अनावर झाल्या आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाबाहेर प्रचंड गर्दी असल्यामुळे प्रशासनाने नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.

