पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने आज संभाजी भिडे यांनी शरदचंद्रपवार यांच्या विषयी केलेल्या आक्षेपार्ह व अपमानास्पद विधानांच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात आले.देशाचे कृषीमंत्री, संरक्षण मंत्री अशी अत्यंत महत्त्वाची पदे भूषवलेले, देशसेवेसाठी संपूर्ण आयुष्य वाहिलेल्या शरदचंद्रपवार साहेबांवर “देशद्रोही” असा आरोप करणे हे अत्यंत दुर्दैवी, बेजबाबदार व निषेधार्ह आहे. अशा थोर राष्ट्रनेत्यावर आरोप करणाऱ्या संभाजी भिडे यांनी देशासाठी नेमके कोणते उल्लेखनीय कार्य केले आहे, हा प्रश्न जनतेला पडलेला आहे.असे यावेळी राष्ट्रवादी श. प . चे प्रभारी अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी म्हटले.
ते म्हणाले,’ सतत वादग्रस्त विधाने करणे, महिलांच्या आई-बहिणींच्या पेहरावावर अशोभनीय वक्तव्य करणे आणि समाजात द्वेष पसरवण्याचे काम करणाऱ्या व्यक्तीने पवार साहेबांसारख्या पद्मविभूषण सन्मानित नेत्याबद्दल बोलणे ही त्यांची बौद्धिक दिवाळखोरी दर्शवते. विशेष म्हणजे अशा व्यक्तीस मोदी सरकारकडून “सो.” किताब बहाल केला जाणे ही गंभीर बाब आहे.संभाजी भिडे यांनी केलेल्या विधानांबद्दल महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी, अशी आमची ठाम मागणी आहे.
या आंदोलनात अध्यक्ष श्रीकांत पाटील, उदय महाले, स्वाती पोकळे, भगवान साळुंके, डॉ. सुनील जगताप, किशोर काबळे, औदुंबर खुने,श्रद्धा ताई कुदळे, हेमंत येवलेकर, रोहन पायगुडे ,अमोघ ढमाले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

