लायन्स क्लब ऑफ पुणे सहकार नगर व भरत नाट्य संशोधन मंदिर आयोजित महाराष्ट्र गंधर्व नाट्य संगीत स्पर्धेचे पारितोषिक वितरण
पुणे : नाट्यसंगीत हे अभिजात शास्त्रीय संगीतच असून त्यात रंग भरल्यास ते नाट्यसंगीत होते. नाट्यसंगीताच्या जोडीला अभिनय असावा, अभिनयातून गाणे यावे आणि गाण्यातून अभिनय दर्शविता आला पाहिजे, असा सल्ला ज्येष्ठ गायक अभिनेते पंडित चंद्रकांत लिमये यांनी दिला.
लायन्स क्लब ऑफ पुणे सहकार नगर व भरत नाट्य संशोधन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र गंधर्व नाट्य संगीत स्पर्धेचे पारितोषिक वितरण पंडित चंद्रकांत लिमये यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. भरत नाट्य मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, प्रज्ञा लिमये, लायन्स क्लबचे उपप्रांतपाल राजेंद्र गोयल, लायन्स क्लब ऑफ पुणे सहकार नगरचे अध्यक्ष मिलिंद तलाठी, संयोजक डॉ. प्रसाद खंडागळे, भरत नाट्य मंदिराचे अध्यक्ष पंडित पांडुरंग मुखडे मंचावर होते. स्पर्धेचे परिक्षण भक्ती गोखले-पागे व ऋषिकेश बडवे यांनी केले. पुण्यासह मुंबई, बीड, लातूर, रत्नागिरी आदी शहरांमधून स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. शिवराज कदम, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, मिलिंद तलाठी, निर्माते-दिग्दर्शक अशोक जाधव यांच्या हस्ते झाले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कै. सुधाकर वामन खंडागळे, अध्यासन जेजुरी, दुर्गम प्रतिष्ठान पुणे, दीपक दंडवते, प्रदीप रत्नपारखी, नंदकुमार जाधव, रवींद्र पठारे, जनार्दन माने यांचे सहकार्य लाभले.
नाट्यसंगीत हे रागदारी संगीतच आहे, असे सांगून पंडित चंद्रकांत लिमये म्हणाले, शब्दाबरोबरच रसिकांपर्यंत भावही पोहोचणे आवश्यक आहे. गुरूंवर निष्ठा ठेऊन विद्या ग्रहण करा, असा सल्लाही त्यांनी दिला.
परीक्षकांच्या वतीने बोलताना ऋषिकेश बडवे म्हणाले, नाट्यगीत सादर करण्यापूर्वी त्या गीतामागील पार्श्वभूमी जाणून घेणे आवश्यक आहे. ती जर समजली तरच नाट्यगीतातील भाव रसिकांपर्यंत पोहोचू शकतो.
स्पर्धकांना हिमांशू जोशी, केदार कुलकर्णी, देवेंद्र पटवर्धन, ज्ञानेश महाडिक यांनी साथसंगत केली.
मान्यवरांचे स्वागत प्रसाद कुलकर्णी यांनी केले तर परिचय अभय जबडे, प्रियंका डोळे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलम खंडागळे, चारुलता पाटणकर यांनी केले तर आभार संजय डोळे यांनी मानले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल
गट क्र. १ : प्रथम – मनवा देशपांडे, द्वितीय – स्वरा प्रभुगावकर. उत्तेजनार्थ – स्वरा भोळे, मैत्री थत्ते, ऋत्विक लोणकर.
गट क्र. २ : प्रथम – श्रीया शिंदे, द्वितीय – श्रेया देवधर, तृतीय भार्गव देशपांडे. उत्तेजनार्थ – वेद मुळे, सिद्धी मुळे, अजिंक्य कुलकर्णी.
गट क्र. ३ : प्रथम – अमृता मोडक. उत्तेजनार्थ – अर्चना बारसोडे.
गट क्र. ४ : प्रथम – जान्हवी खडपकर, द्वितीय – ऐर्श्र्वया भोळे. उत्तेजनार्थ – आदित्य लिमये, अमृता मोडक, आरोही भामे.

