एमआयटी डब्ल्यूपीयूत आयोजित ‘मराठी भाषा आणि बोली’ परिसंवादात मान्यवरांचा सुर
पुणे, दि. २७ जानेवारी :”अमृताहुनी गोड मराठी भाषा समृद्ध व संपन्न आहे. कोसाकोसावर बदलत जाणार्या भाषेत सुद्धा एका बाजुला शुद्ध मराठीतील प्रमाण भाषा, कठोरता, जिव्हाळ्याची आणि अभिमान असणारी मातृबोली यांच्यातील दरी जर आपणास कमी करता आली तर नक्कीच मराठी भाषेला भरपूर फायदा होईल.” असे विचार मान्यवरांनी व्यक्त केले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (डब्ल्यूपीयू) च्या स्कूल ऑफ एज्युकेशन यांच्या तर्फे ‘मराठी भाषा आणि बोली’ या विषयावर आयोजित परिसंवादात मान्यवरांनी आशा व्यक्त केली की मराठी साहित्यिक, प्रकाशक, मराठी पाठ्यपुस्तक, शिक्षक, अभ्यासु वाचक, मराठी भाषेचे जाणकार इ. यांची जबाबदारी आहे की, मराठी भाषेची समृद्धता साहित्यात कशी टिकवून ठेवावी व त्याच दर्जेदार साहित्यकृतीला महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळवून द्यावी.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड व कार्याध्यक्ष डॉ. राहुल वि. कराड यांच्या मार्गदर्शनात या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
एमआयटी डब्ल्यूपीयूच्या ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित कार्यक्रमात सुशील धसकटे, उद्धव धुमाळे आणि धनंजय भावलेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस उपस्थित होते. अध्यक्षस्थानी स्कूल ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्य डॉ. शालिनी टोणपे होत्या. तसेच स्कूल ऑफ एज्युकेशनचे सहायक प्राध्यापक प्रा. प्रिया काळे उपस्थित होत्या.
या प्रसंगी सुनील धसकटे यांनी ‘भाषा, बोली आणि आपण’ यावर विचार मांडले. भाषेचे संवर्धन करण्याचे कार्य हे शोकांतिकेचे लक्षण आहे. खेड्यातील लोकांनी मराठी भाषेला जीवंत ठेवण्याचे कार्य केले आहे. त्यांनी भाषेबरोबरच संस्कृतीचे जतन केले आहे. भाषेला हस्तांतरीत करण्याचे कार्य बोली भाषा करते. आधुनिक काळात जगातील ५० टक्के बोली भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. विकासाच्या जगात भाषेचा संबंध तुटत असतांना युनो ने सांगितले की मातृभाषेतून शिक्षण दिल्यास शारीरिक, मानसिक, भावनिक व बौद्धिक प्रगती होते.”
उद्धव धुमाळे यांनी ‘भाषा, बोली आणि वृत्तपत्र’ विषायावर मत मांडतांना म्हणाले की, सोशल आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया ने विश्वास गमावल्यानंतर विश्वासार्हता जपणारे प्रिंट मीडियाचे भविष्य उज्वल आहे. दर्पणकार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रसार माध्यमातून सत्तेला आरसा दाखविण्याचे कार्य केले. संपादकीय मध्ये विचारांची बैठक आहे. यातून विचार आणि प्रेरणा मिळते. वर्तमान काळात माध्यमातील लोकांनी शब्दांचा जपून वापर करावा. शब्द अर्थहीन होऊ देऊ नये. मोबाइलच्या अति वापरामुळे विचार संपतो. आज माध्यमांचे काम समाजाला आणि राजकारणी मंडळींना प्रश्न विचारणे आहे. पत्रकारांकडे चिकित्सक दृष्टी बरोबरच ज्ञान आणि कर्माची सांगड हवी आहे.
धनंजय भावलेकर यांनी ‘भाषा, बोली आणि चित्रपट’ या विषयावर विचार मांडले. त्यांनी सांगितले की, भाषेत शुद्ध आणि अशुद्ध अस काही ही नसत. बोली भाषेत उच्चार, डोळ्यांचे भाव, हातवारे याचा समावेश असतो. खर तर न्यायाची भाषा ही प्रमाण भाषा आहे. भाषेतील न्यूनगंड घालविण्याचे कार्य चित्रपटाने केले आहे. मायग्रेशन मुळे भाषा लुप्त होते. त्यामुळेच राज्यातील ३ भाषा आणि देशातील १०० भाषा या लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.
त्यानंतर सागर शंकर व डॉ. शालिनी टोपणे यांनी रोजच्या बोलण्यात मराठी भाषेचा वापर करावा असे सांगितले.
प्रा.प्रिया काळे यांनी स्वागतपर भाषण केले. डॉ. वंदना केंजळे यांनी सूत्रसंचालन केले.

