प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजवंदन कार्यक्रम
मुंबई, दि. २७ जानेवारी २०२६: प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आयोजित ध्वजवंदन व संचलनाच्या शासकीय कार्यक्रमात महावितरणचा चित्ररथ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. मा. मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ‘अन्नदाता ते ऊर्जादाता’ या संकल्पनेवर आधारीत महावितरणच्या या चित्ररथाचे कौतुक केले आहे.
मा. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी देशात सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी व शेतकऱ्यांना शाश्वत व मोफत वीज उपलब्ध करून देण्यासाठी अन्नदाता ते ऊर्जदाता ही संकल्पना राबवली आहे. मा. मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या प्रभावी अंमलबजावणीतून राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज उपलब्ध करून देत या संकल्पनेच्या पुर्ततेला मोठी गती दिली आहे. या योजनांमधून राज्यातील ४५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रजासत्ताक आयोजित कार्यक्रमात चित्ररथाच्या माध्यमातून महावितरणने केवळ तंत्रज्ञान नव्हे, तर पर्यावरणाभिमुख व समृद्ध महाराष्ट्राचे चित्र मांडले आहे. देशातील पहिले सौरग्राम ठरलेल्या सातारा जिल्ह्यातील मान्याची वाडीचा देखावा चित्ररथात लक्षवेधक ठरला.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत १६ हजार मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प प्रस्तावित असून आत्तापर्यंत ३ हजार ३०० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. यातून ८ लाख शेतकऱ्यांच्या ४० लाख एकर शेतीला दिवसा व शाश्वत वीजपुरवठा सुरू आहे. तर मागेल त्याला सौर कृषी पंप योजने अंतर्गत ११ लाख शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्याचे उद्दिष्ट मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत एकाच महिन्यात ४५ हजार ९११ शेतकऱ्यांना सौर कृषिपंप बसवण्याचा विश्वविक्रम ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवला गेला आहे. याशिवाय प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत ४ लाख २५ हजार घरगुती ग्राहकही विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण व स्वावलंबी झाले आहेत.

