भारत-युरोपियन युनियन संयुक्त पत्रकार परिषदेतील पंतप्रधानांचे निवेदन
महोदय,
अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन,
दोन्ही देशांचे प्रतिनिधी,
माध्यमांमधील सहकारी,
नमस्कार!
या अभूतपूर्व भारत भेटीसाठी आलेले, माझे दोन जवळचे मित्र, अध्यक्ष कोस्टा आणि अध्यक्ष वॉन डेर लेयन यांचे स्वागत करताना मला आनंद वाटत आहे. कोस्टा जी, हे आपली साधी जीवनशैली आणि समाजावरील प्रेमासाठी “लिस्बनचे गांधी” म्हणून ओळखले जातात आणि उर्सुला जी, या जर्मनीच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री आणि युरोपियन युनियन कमिशनच्याही पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान आहेत.
काल एक ऐतिहासिक क्षण होता, जेव्हा युरोपियन युनियनचे नेते प्रथमच भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले. आज आणखी एक ऐतिहासिक प्रसंग आला आहे, जेव्हा जगातील दोन सर्वात मोठ्या लोकशाही शक्ति आपल्या संबंधांमध्ये निर्णायक अध्याय जोडत आहेत.
मित्रहो,
गेल्या काही वर्षांत भारत आणि युरोपियन दरम्यानच्या संबंधांमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. सामायिक लोकशाही मूल्ये, आर्थिक ताळमेळ आणि दोन्ही देशांच्या जनतेमधील मजबूत संबंधांच्या आधारावर आमची भागीदारी नवी उंची गाठत आहे. आज आमच्यात 180 अब्ज युरोचा व्यापार आहे. आठ लाखांहून अधिक भारतीय, युरोपियन युनियनच्या देशांमध्ये राहत आहेत आणि सक्रिय योगदान देत आहेत. आम्ही धोरणात्मक तंत्रज्ञानापासून ते स्वच्छ ऊर्जेपर्यंत, डिजिटल प्रशासनापासून ते विकास भागीदारीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात सहकार्याचे नवे आयाम स्थापित केले आहेत. या कामगिरीच्या आधारावर आजच्या शिखर परिषदेत आम्ही समाजाच्या सर्व घटकांना लाभ देणारे अनेक निर्णय घेतले आहेत.
मित्रहो,
आज भारताने आपल्या इतिहासातील सर्वात मोठा मुक्त व्यापार करार केला आहे. आज 27 तारीख आहे आणि हा एक सुखद योगायोग आहे की या दिवशी भारत युरोपियन युनियनच्या 27 देशांबरोबर एफटीए करत आहे. या ऐतिहासिक करारामुळे आमच्या शेतकरी आणि छोट्या उद्योगांना युरोपियन बाजारपेठेत प्रवेश करणे सोपे होईल, उत्पादन क्षेत्रात नवीन संधी निर्माण होतील आणि आमच्या सेवा क्षेत्रातील सहकार्य आणखी मजबूत होईल. एवढेच नाही, तर या मुक्त व्यापार करारामुळे भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील गुंतवणुकीला चालना मिळेल आणि नवीन नवोन्मेषी भागीदारी निर्माण होईल. हा करार जागतिक स्तरावर पुरवठा साखळी मजबूत करेल. म्हणजेच हा केवळ व्यापार करार नाही, तर सामायिक समृद्धीची ही नवी ब्लू प्रिंट आहे.
मित्रहो,
या महत्वाकांक्षी एफटीए बरोबरच आम्ही गतिशीलतेसाठी एक नवीन आराखडाही तयार करत आहोत. यामुळे भारतीय विद्यार्थी, कामगार आणि व्यावसायिकांसाठी युरोपियन युनियनमध्ये नवीन संधी खुल्या होतील. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आमचे दीर्घकाळापासून व्यापक सहकार्य आहे. आज आम्ही हे महत्त्वाचे संबंध आणखी मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे.
मित्रहो,
संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य हा कोणत्याही धोरणात्मक भागीदारीचा पाया असतो आणि आज आम्ही सुरक्षा आणि संरक्षण भागीदारीद्वारे त्याला औपचारिक स्वरूप देत आहोत. यामुळे दहशतवादविरोधी, सागरी आणि सायबर सुरक्षेतील आमची भागीदारी आणखी दृढ होईल. यामुळे नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेप्रति आमची सामायिक वचनबद्धता देखील अधिक दृढ होईल. हिंद-प्रशांत क्षेत्रात आमच्या सहकार्याची व्याप्ती वाढेल. आणि यामुळे आमच्या संरक्षण कंपन्यांना सह-विकास आणि सह-उत्पादनासाठी नव्या संधी मिळतील.
मित्रहो,
आज या कामगिरीच्या आधारे आम्ही पुढील 5 वर्षांसाठी अधिक महत्वाकांक्षी आणि समग्र धोरणात्मक अजेंडा जारी करत आहोत. सध्याच्या जटिल जागतिक वातावरणात हा कार्यक्रम स्पष्ट दिशा देईल, आपल्या सामायिक समृद्धीला चालना देईल, नवोन्मेषाला गती देईल, सुरक्षा सहकार्य अधिक मजबूत करेल आणि लोकांमधील परस्पर संबंध अधिक घट्ट करेल.
मित्रहो,
भारत आणि युरोपियन युनियन यांचे सहकार्य ‘जागतिक कल्याणासाठी एक भागीदारी’ आहे. आम्ही हिंद-प्रशांत क्षेत्रापासून ते कॅरेबियन पर्यंत, त्रिपक्षीय प्रकल्पांचा विस्तार करू. यामुळे शाश्वत शेती, स्वच्छ ऊर्जा आणि महिला सक्षमीकरणाला भक्कम समर्थन मिळेल. आम्ही एकत्रितपणे IMEC कॉरिडोरला, जागतिक व्यापार आणि शाश्वत विकासाचा एक प्रमुख दुवा म्हणून स्थापित करू.
मित्रहो,
आज जागतिक व्यवस्थेत बरीच उलथापालथ होत आहे. अशा स्थितीत भारत आणि युरोपियन युनियनची भागीदारी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत स्थैर्याला बळकटी देईल. या संदर्भात आज आम्ही यूक्रेन, पश्चिम आशिया, हिंद-प्रशांत सह अनेक जागतिक मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली. बहुपक्षवाद आणि आंतरराष्ट्रीय निकषांचा आदर याला आमचे सामायिक प्राधान्य आहे. आजच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे यावर आमचे एकमत आहे.
मित्रहो,
राष्ट्रांमधील संबंधांमध्ये कधी-कधी असा क्षण येतो, जेव्हा इतिहास स्वतःच सांगतो, येथून दिशा बदलली, येथून एका नवीन युगाची सुरुवात झाली. भारत आणि युरोपियन युनियनमधील आजची ही ऐतिहासिक शिखर परिषद हा तसाच क्षण आहे. मी पुन्हा एकदा, या अभूतपूर्व भेटीबद्दल, भारताप्रती असलेल्या तुमच्या मैत्रीबद्दल आणि आपल्या सामायिक भविष्याप्रति तुमच्या वचनबद्धतेबद्दल अध्यक्ष कोस्टा आणि अध्यक्ष वॉन डेर लेयन यांचे मनापासून आभार मानतो.
यूरोपीय परिषदेचे अध्यक्ष आणि यूरोपीय आयोगाच्या अध्यक्ष यांच्या भारत भेटीदरम्यान झालेल्या करार, घोषणा, इत्यादींची सूची
| क्र | दस्तऐवज | क्षेत्रे |
| 1. | 2030 च्या दिशेने : भारत -यूरोपीय संघ संयुक्त सर्वसमावेशक धोरणात्मक कार्यक्रम | भारत यूरोपीय संघ धोरणात्मक भागीदारीच्या सर्व पैलूंविषयीचा सर्वसमावेशक दस्तऐवज. |
| 2. | भारत- यूरोपीय संघ मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी पूर्ण झाल्याची संयुक्त घोषणा | व्यापार व अर्थव्यवस्था; आणि वित्त |
| 3. | भारतीय रिझर्व बँक आणि युरोपियन सिक्युरिटीज अँड मार्केट अथॉरिटी (ईएसएमए) यांच्यात सामंजस्य करार | |
| 4. | प्रगत इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी आणि शिक्का संबंधी प्रशासकीय व्यवस्था | |
| 5. | सुरक्षा आणि संरक्षण भागीदारी | संरक्षण आणि सुरक्षा |
| 6. | भारत- यूरोपीय संघ माहिती सुरक्षा करारासाठी वाटाघाटींचा प्रारंभ | |
| 7. | गतिशीलतेवरील सहकार्यासाठी सर्वसमावेशक चौकटीबाबत सामंजस्य करार | कौशल्य आणि गतिशीलता |
| 8. | भारतात कौशल्य गतिशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने यूरोपीय संघाचे प्रायोगिक लीगल गेटवे ऑफिस स्थापन करण्याची घोषणा | |
| 9. | आपत्ती जोखीम व्यवस्थापन आणि आपत्कालीन प्रतिसाद यातील सहकार्यासंबंधी एनडीएमए आणि यूरोपीय नागरी संरक्षण आणि मानवतावादी मदत कार्यांसाठीचे महासंचालनालय (डीजी-ईसीएचओ) यांच्यात प्रशासकीय व्यवस्था | आपत्ती व्यवस्थापन |
| 10. | हरित हायड्रोजन कृती दलाची स्थापना | स्वच्छ ऊर्जा |
| 11. | वैज्ञानिक आणि तांत्रिक सहकार्य यावरील भारत-ईयू कराराचे 2025- 2030 या कालावधीसाठी नूतनीकरण | विज्ञान व तंत्रज्ञान आणि संशोधन व नवोन्मेष |
| 12. | होरायझन यूरोप कार्यक्रमासह सहकार्य करारात भारताच्या प्रवेशासाठी प्रारंभिक चर्चा सुरू | |
| 13. | महिला आणि तरुणांसाठी डिजिटल नवोन्मेष आणि कौशल्य केंद्र; कृषी आणि अन्न प्रणालींमध्ये महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सौर-आधारित उपाययोजना; पूर्वइशारा देणाऱ्या प्रणाली; आणि आफ्रिका, हिंद-प्रशांत व कॅरिबियन क्षेत्रातील लहान द्वीपसमूहात्मक विकसनशील राष्ट्रांमध्ये सौर-आधारित शाश्वत ऊर्जा संक्रमण यावर भारत-ईयू त्रिपक्षीय सहकार्याअंतर्गत चार प्रकल्पांची संयुक्त अंमलबजावणी करण्याचा करार | कनेक्टीव्हिटी |

