पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहरच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पक्षकार्याालयात आज संपन्न झाली. या बैठकीत सर्वांनुमते ॲड. निलेश निकम यांची पुणे महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली.
सदर प्रसंगी आ. चेतन तुपे शहराध्यक्ष सुनिल टिंगरे , सुभाष जगताप, प्रदीप देशमुख, दिपक मानकर , अक्रुर कुदळे , बाबूराव चांदेरे , दत्ता बहिरट व पक्षाचे इतर नवनिर्वाचीत नगरसेवक उपस्थित होते.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याची व पुढील काळातील कामकाजाचे स्वरूप याविषयीचे विचारमंथन करण्यात आले , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची भूमिका विकासाभिमुख, लोकाभिमुख आणि जबाबदार असल्याचे सांगत, त्याच धर्तीवर पुणेकरांनी दिलेल्या विश्वासाला न्याय देणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले . अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहराच्या हितासाठी, नागरिकांच्या प्रश्नांसाठी आणि मजबूत महापालिकेसाठी सर्वांनी एकसंघपणे काम करत राहण्याचा संकल्प केला.
निलेश निकम यांचे वडील ॲड. N. T. निकम हे देखील नगरसेवक होते , उपमहापौर पद त्यांनी भूषविले होते. यामुळे वडिलांपासून च त्यांच्या घरात राजकारण आणि वकिली या दोन्ही क्षेत्राचा वावर राहिला .
निलेश निकम यांनी 1992 साली पहिल्यांदा नगरसेवक म्हणून महानगरपालिकेत प्रवेश केला. त्यानंतर 1992 ते 2012 या कालावधीत त्यांनी सलग 4 वेळा नगरसेवकपद भूषवून पुणे शहराच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे.
सन 2009-10 मध्ये स्थायी समिती अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांनी सर्वसामान्य, गरीब व गरजू घटकांसाठी महत्त्वपूर्ण ठरलेली “शहरी गरीब योजना” महानगरपालिकेत त्यांच्या अध्यक्षतेखाली प्रभावीपणे राबवली. ही योजना आजही पुणे महानगरपालिकेमध्ये यशस्वीपणे सुरू असून, त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात पुणेकर नागरिक घेत आहेत, हे त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे उत्तम उदाहरण आहे.
तसेच 2010-11 मध्ये सभागृह नेता म्हणून त्यांनी महापालिकेच्या कामकाजात सुसूत्रता, शिस्त आणि लोकहिताचा दृष्टिकोन ठेवत प्रभावी भूमिका बजावली.
त्यानंतर तब्बल 14 वर्षांनंतर, 2026 मध्ये पुन्हा एकदा नगरसेवक होण्याचा मान निलेश निकम यांना मिळाला आहे. त्यांच्या अनुभव, कार्यक्षमता आणि नेतृत्वावर विश्वास ठेवत अजितदादांच्या सूचनेनुसार पुन्हा एकदा त्यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
निलेश निकम यांच्या या नियुक्तीमुळे पुणे महानगरपालिकेतील / सत्ताधारी गटाला सक्षम, अनुभवी आणि लोकाभिमुख नेतृत्व लाभले असून, पुणे शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी ते अधिक प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे…

