बांगलादेशींवर कारवाईच्या नावाखाली पोलिसांकडून लूट
पुणे- घुसखोर बांगलादेशींवर कारवाई करण्याच्या गृहविभागाच्या आदेशाचा काही पोलिस अधिकाऱ्यांनी चक्क ‘धंदा’ मांडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. खाकी वर्दीतील दरोडेखोरांचा नवी मुंबई आणि कल्याण परिसरात उच्छाद पाहायला मिळत असून, घुसखोर बांगलादेशींविरोधातील कारवाईचा फायदा घेत त्यांनाच लुटणाऱ्या एका सहायक पोलिस निरीक्षकासह (API) चार पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईच्या नावाखाली घरात घुसून रोख रक्कम आणि दागिने असा सुमारे २५ ते ३० लाखांचा ऐवज लुटल्याचा खळबळजनक प्रकार चेंबूरच्या आरसीएफ पोलिस तपासात उघडकीस आला आहे.
नवी मुंबईतील एका बारमध्ये काम करणारी अस्मा पॉली (मूळची बांगलादेशी) ही २ जानेवारी २०२६ रोजी कोपरखैरणे येथील तिच्या घरी असताना, साध्या वेशात काही पोलिस एका एजंटसह तिच्या घरी आले. त्यांनी अस्माची चौकशी केली आणि तिला बळजबरीने पोलिसांच्या गाडीत बसवले. अस्मा गाडीत असताना पोलिसांनी तिच्या घराची झडती घेतली. मात्र, पोलिस ठाण्यात नेल्यानंतर अस्माला तिच्या बहिणीकडून समजले की, घरातील सर्व सामान गायब आहे. अस्माच्या दाव्यानुसार, पोलिसांनी तिच्या घरातून १५ तोळे सोने आणि २० ते २५ लाख रुपयांची रोकड लंपास केली होती.
लूट केल्यानंतर हे प्रकरण अंगाशी येईल, या भीतीने पोलिसांनी अस्मा काम करत असलेल्या बारच्या मालक रमेश अण्णाला मध्यस्थीसाठी बोलावले. पोलिसांनी चोरलेल्या रकमेपैकी केवळ ५ ते ६ लाख रुपये आणि काही दागिने बार मालकाकडे सुपूर्द करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. तसेच, पोलीस शिपाई खांडके याने अस्माला “याबद्दल कुणालाही काही सांगायचे नाही,” अशी धमकीही दिली. मात्र, आपल्या कष्टाची मोठी रक्कम आणि दागिने गेल्याने अस्माने हिंमत करून आरसीएफ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तपासादरम्यान समोर आले की, याच पोलिस पथकाने २५ डिसेंबर २०२५ रोजी कल्याणमधील शर्मिण खातून या बांगलादेशी महिलेच्या घरात घुसून तिलाही कारवाईची भीती घातली आणि ५ लाख रुपये उकळले होते. पोलिसांसोबत एक अज्ञात एजंट असायचा, जो बांगलादेशींच्या घरांची माहिती काढून त्यांना घाबरवण्याचे काम करायचा. आरसीएफ पोलिसांनी याप्रकरणी ४ पोलिस कर्मचारी आणि १ अज्ञात व्यक्तीवर BNS कलम ३०५ (A), ३०८(२), ३५१(२) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
ज्या घुसखोरांमुळे देश धोक्यात असल्याचे सांगून गृह विभाग कारवाईचे आदेश देत आहे, त्याच घुसखोरांना लुटण्यासाठी पोलिस दलातील अधिकारी दरोडे टाकत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारवाईच्या नावाखाली लुटमार करणाऱ्या या पोलिसांवर आता कोणती कठोर विभागीय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

