पुणे- नदी सुधारणा प्रकल्पावरून पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणवादी विश्वंभर चौधरी यांनी महापालिका , प्रशासकीय अधिकारी आणि थेट पुणेकरांवर देखील संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियातून त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. त्याचे झाले असे काही हजार कोटींच्या नदी सुधार प्रकल्पात नदीच्या प्रदूषणावर मात करणे आणि नदी सुशोभित करणे याबाबतचा प्रकल्प गेली काही वर्षे महापालिका राबवीत आहे. यासाठी आता पर्यंत सुमारे १००० कोटी रुपये खर्च देखील झालेले आहेत . आता लवकरच महापालिका यातील पूर्ण झालेल्या १.५० कि.मी. ट्रॅकचे लोकार्पण पुणे महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त १५.०२.२०२६ रोजी करण्यात येणार असून, नागरिकांसाठी सकाळी ६ ते ९ व संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत वापरासाठी उपलब्ध करणार आहे.त्या अनुषंगाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज संबधित ठिकाणी भेट देऊन फोटो सेशन करत हे जाहीर करून टाकले आहे. हे फोटो पाहूनच आपली प्रतिक्रिया विश्वंभर चौधरी यांनी व्यक्त केली आहे … पहा त्यांच्याच शब्दात त्यांनी काय म्हटले आहे.

पुणे महापालिकेच्या अधिकृत पेजवरचा फोटो. नदीचं किती वाटोळं केलं ते पुणेकरांना कळलं तरी वळणार नाही. मरायला लागलं तरी विकासखोर पक्षालाच मतं देणार.
नैसर्गिक काठ उद्ध्वस्त केलेत दोन्ही बाजूंचे आणि मोठी झाडं तोडून सिमेंटच्या पायर्या बनवल्या आणि त्यात मग तुरळक छोटी झाडं लावून पर्यावरणप्रेम दाखवलंय. इतका भंपक विकास जगात कुठेही नसतो. टेंडर आणि पैसा यांनी उद्युक्त झालं की एवढाच विकास होणार.
पुणेकरांनो आता उन्हाळ्यात बूड पोळवत बसा या या सिमेंटच्या कट्ट्यावर आणि बघत रहा गटार केलेल्या नदीकडे. पण प्रश्न विचारू नका. लाडक्या पक्षाला भंपक विकासासाठी मत देऊन नैसर्गिक आपत्ती ओढवून घ्या पुरासारख्या पण प्रश्न नका विचारू.
काय म्हणतोय हे कळत नसेल तर अहमदाबादला जाऊन साबरमती बघा. तिचे असेच हाल केलेत. साबरमतीच्या नदीपात्रात तापमान गांधींच्या आश्रमापेक्षा दोन-तीन डिग्री जास्त वाटतं. नदीचं वाळवंट केलंय. मुठेचंही वेगळं काही होणार नाही.
नदी कधीच एकटी नसते. तिच्या काठावरची पूर नियंत्रणात आणणारी झाडी, तिनं तयार केलेल्या छोट्या पाणथळ जागा, तिथले किडे, पक्षी, वाळू आणि बरंच काही मिळून बनते ती नदी. अन्यथा सिमेंटचं बंदीस्त गटार.

