पुणे -राष्ट्रीय नदी संवर्धन योजने अंतर्गत पुणे शहरातील मुळा-मुठा नदीचे प्रदूषण नियंत्रण करणे (PARMM प्रकल्प) या प्रकल्पांतर्गत पुणे शहरामध्ये विविध ११ ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रं उभारणेचे काम सुरू आहे. या कामाअंतर्गत प्रकल्पाकडे जाणाऱ्या मुख्य मलवाहिन्या (Missing Links) विकसित करणेचे काम करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय, जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (JICA) व पुणे महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने सदर प्रकल्पाचे काम सुरू आहे. या कामाकरीता ठेकेदार Enviro Control and Toshiba Water Solutions JV यांना दि. ०३/०३/२०२२ रोजी कार्यादेश देणेत आलेला आहे. सदर प्रकल्पाचे भूमी पुजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते दि. ०६/०३/२०२२ रोजी करण्यात आले आहे. मैलापाणी शुद्धीकरण केंद्रामधून प्रक्रिया केलेल्या मैलापाण्याची गुणवत्ता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अद्ययावत मानकानुसार असणार आहे. एकूण ११ मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांपैकी १० एमएलडी बोटॅनिकल गार्डन, औंध वगळता उर्वरित १० मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांची कामे प्रत्यक्ष जागेवर सुरू आहेत.
सध्या उपरोक्त ११ मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांपैकी २० एमएलडी मुंढवा, २८ एम.एल.डी. वारजे व २६ एमएलडी वडगाव मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांची कामे पूर्णत्वास येत असून इलेक्ट्रोमेकॅनिकल सामग्रीची ड्राय रन टेस्ट घेण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यांची एकत्रित क्षमता ७४ एमएलडी आहे. यानंतर सदर मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांचे वेट टेस्ट घेण्यात येणार आहे. यामध्ये उपरोक्त तीन मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांमध्ये मैलापाणी घेऊन आवश्यक त्या चाचण्या पूर्ण करणेत येणार आहेत. तदनंतर प्रत्यक्ष मैलापाणी शुद्धीकरण केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू होईल.
मुंढवा २० एमएलडी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रामध्ये हांडेवाडी, मोहम्मद वाडी, काळेपडळ, ससाणे नगर, माळवाडी, मगरपट्टा, साडेसतरा नळी, इंडस्ट्रियल इस्टेट हडपसर, ताडी गुत्ता चौक परिसरातील मैलापाण्यावर प्रक्रिया करणेत येणार आहे, या ठिकाणी अस्तित्वातील ४५ एम.एल.डी. क्षमतेचे मैलापाणी शुद्धीकरण केंद्र असून नव्याने २० एम.एल.डी. क्षमतेचे मैलापाणी शुद्धीकरण केंद्र बांधणेत आलेले आहे. वारजे येथील २८ एम एलडी क्षमतेचे मैलापाणी शुद्धीकरण केंद्राला वारजे परिसर, रामनगर परिसरातील, मैलापाणी येणार आहे. तसेच वडगाव येथील २६ एमएलडी मैलापाणी शुद्धीकरण केंद्राला रायकर मळा, धायरी गाव, जांभुळवाडी, नन्हे, आंबेगाव परिसरातील मैलापाणी येणार असून त्यावर प्रक्रिया करणेत येणार आहे.
यानंतर मत्स्यबीज केंद्र हडपसर येथील ०७ एमएलडी क्षमतेचे व ३० एमएलडी खराडी या मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांचे कार्यान्वयन होणेकामी ड्राय रन, ट्रायल टेस्ट पुढील दोन महिन्यात सुरू करणेचे नियोजन आहे. उर्वरित ०५ मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांचे काम सन २०२६ अखेर पूर्ण करणेचे नियोजन आहे.
केंद्र शासनाचे राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत ९९०.२६ कोटी रकमेचा प्रकल्प १४ जानेवारी २०१६ रोजी मंजूर करणेत आलेला असून त्यापैकी केंद्र शासनाकडून एकूण अनुदान ८४१.७२ कोटी (८५ टक्के) व पुणे महानगरपालिकेचा वाटा र.रू. १४८.५४ कोटी (१५ टक्के) इतका आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे ११७३ कोटी असून केंद्र शासनाकडून अद्यापपर्यंत रक्कम ६२१.४५ कोटी इतके अनुदान प्राप्त झाले आहे. PARMM प्रकल्पाचा आतापर्यंत एकूण खर्च ८४४.४५१ कोटी झाला आहे. सदरचे काम पूर्ण झालेनंतर पुढील १५ वर्षे प्रकल्पाची देखभाल दुरुस्ती ठेकेदारामार्फत करणेत येणार आहे. त्यासाठी र.रू. ३००.२१ कोटी इतका खर्च येणार आहे.
PARMM प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेची एकूण मैलापाणी प्रक्रिया क्षमता (अस्तित्वातील मैलापाणी शुद्धीकरण केंद्र ४७७ एम.एल.डी. ३९६ एम.एल. डी. (PARMM प्रकल्प) + २२ एम.एल.डी. (पुणे मनपा)) ८९५ एम.एल.डी. इतकी होणार आहे.
सदरचे प्रकल्पीय काम प्रगतीपथावर असून प्रकल्प योजना कार्यान्वीत झाल्यानंतर संपूर्ण योजनेचा लोकार्पण कार्यक्रम लोकप्रतिनिधींच्या हस्ते करणेत येणार आहे.

