आयआयएम नागपूरमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
नागपूर, २६ जानेवारी:
“भारताने आता संपूर्ण जगाला नेतृत्व प्रदान करण्याची वेळ आलेली आहे. पुढील
शतक आपले आहे, आणि या प्रवासात आपण सर्वांनी जबाबदारीने व
आत्मविश्वासाने आपली भूमिका बजावली पाहिजे,” असे प्रतिपादन भारतीय
प्रबंध संस्थान नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांनी सोमवारी केले.
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ध्वजारोहणानंतर ते उपस्थितांशी संवाद साधत
होते.
“भारताच्या सतातीपूर्ण प्रगतीमागे संविधानाचे मजबूत सुरक्षा कवच असल्याचे
डॉ. मेत्री यांनी आपल्या भाषणात नमूद केले. “एक लोकतांत्रिक प्रजासत्ताक
म्हणून आपली ओळख संविधानाच्या संरक्षणामुळे अधिक मजबूत झाली आहे.
संविधानामुळे देशातील लोकशाही मूल्ये, एकता आणि विकासाला दिशा
मिळाली आहे. आज भारत एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर उभा असून,
विविध क्षेत्रांमध्ये देश जागतिक पातळीवर नेतृत्व देण्याच्या दिशेने पुढे जात
आहे,” असे त्यांनी सांगितले.
यापूर्वी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण आणि सुरक्षा
मार्च-पास्ट यांसह झाली. त्यानंतर राष्ट्रगीत सादर करण्यात आले. पुढे आयोजित
सांस्कृतिक कार्यक्रमात आयआयएम नागपूरच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर
विषयांवर स्वलिखित कविता सादर केल्या, तर ड्रामा क्लबने हैदराबाद आणि
गोवा भारतात समाविष्ट होण्याच्या ऐतिहासिक प्रवासावर आधारित प्रभावी
नाटक सादर केले.
संस्थानच्या डान्स क्लबने नृत्य सादर केले. म्युझिक क्लबने देशभक्ती गीतांचा
छोटेखानी संगीत कार्यक्रम सादर केला. प्रजासत्ताक दिनाचा हा सोहळा अभ्युदय
या आयआयएम नागपूरच्या सांस्कृतिक क्लबच्या वतीने आयोजित करण्यात
आला. या कार्यक्रमाला विद्यार्थी, कर्मचारी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने
उपस्थित होते.

