-निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज
सांगली, 25 जानेवारी, 2026: “ईश्वर सर्वव्यापी आहे, सृष्टीच्या कणा-कणा मध्ये तो विराजमान आहे. याला अंगसंग पाहून सदैव त्याच्या जाणीवेत जीवन जगल्यानेच आत्ममंथन व आंतरिक यात्रा शक्य आहे. वरील उद्गार निरंकारी सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या 59व्या संत समागमाच्या प्रथम दिवशी 24 जानेवारी, 2026 रोजी उपस्थित श्रद्धाळूंच्या विशाल जनसमुदायाला संबोधित करताना व्यक्त केले.
सांगली ईश्वरपूर रोडलगत जवळपास 350 एकरच्या विशाल मैदानात आयोजित या तीन दिवसीय समागमामध्ये महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून तसेच देशाच्या विविध प्रांतातून लाखोंच्या संख्येने श्रद्धाळू भक्तगण व प्रभूप्रेमी सज्जन सहभागी झाले आहेत.

सतगुरू माताजी म्हणाल्या, की भक्ती आपण स्वतःमध्ये सुधारणा करण्याचे नाव आहे. मनाला निर्मळ करून जीवनाला सुंदर बनवत मानवतेच्या मार्गावर चालून सहज जीवन जगायचे आहे. साधु-संतांनी निरंतर इतरांचे अवगुण न पाहता स्वतःमध्ये सुधारणा करण्याची शिकवण दिली आहे. नम्रता व सहनशीलता यांसारख्या दिव्य गुणांना धारण करून आपले जीवन उज्ज्वल करायचे आहे.
सतगुरू माताजींनी पुढे सांगितले, की जीवनात जेव्हा ब्रह्मज्ञानाचा प्रकाश येतो, तेव्हा भक्ताला इतरांच्या वेदनांची जाणीव होऊ लागते. त्याच्या अंतरमनात दया व करूणेचा भाव उत्पन्न होतो. ज्याप्रमाणे स्वतःच्या जीवनाचे कल्याण झाले आहे, तद्वत इतरांच्या जीवनातही या ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करण्याचा प्रयत्न तो अत्यंत उदार व नम्र भावनेने करतो. असे संतजन स्वतः ज्ञानाच्या आधारे जीवन जगून हा दैवी संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतात.
शेवटी सतगुरू माताजी म्हणाल्या, की आत्ममंथन हा हृदयापासून विचार करण्याचा विषय आहे शुष्क बौद्धीक तर्क-वितर्काचा विषय नाही. परमात्म्याने या सुंदर जगाची रचना केली आहे. जर आपण या जगात आलो आहोत, तर मनातील विपरीत भावनांना दूर करत मानवतेच्या भावनेने युक्त होऊन जीवन जगायचे आहे. त्याचबरोबर जे बाह्यरूपी प्रदूषण आहे, त्याला देखील दूर करणे आपले कर्तव्य आहे ज्यायोगे या जगताची सुंदरता कायमस्वरूपी टिकेल.
सत्संग कार्यक्रमामध्ये देश-विदेशातून आलेल्या विद्वान वक्ता महात्म्यांनी विविध भाषांचा आधार घेत विचार, भक्ती रचना, कविता व विविध प्रस्तुतींच्या माध्यमातून आपले भाव व्यक्त केले. समागम समितीचे समन्वयक आदरणीय नंदकुमार झांबरे यांनी या कार्यक्रमाच्या मुख्य उद्देशाला अधोरेखित करत आपले भाव प्रकट केले.
सेवादल रॅली
समागमाच्या दुसऱ्या दिवसाची सुरूवात एका आकर्षक सेवादल रॅलीने झाली ज्यामध्ये महाराष्ट्रासह अन्य ठिकाणांहून आलेल्या हजारो सेवादल बंधु-भगिनी आपआपली खाकी-निळी वर्दी परिधान करून सहभागी झाले होते. विदेशातील सेवादल सदस्यांनी देखील त्यांच्या विशिष्ट गणवेषामध्ये या रॅलीमध्ये भाग घेतला. सतगुरू माताजी व निरंकारी राजपिताजींचे रॅलीमध्ये आगमन होताच मंडळाच्या सेवादल आधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन या दिव्य युगुलाचे सहर्ष स्वागत केले.
सेवादल रॅलीला आरंभ केल्यानंतर सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी आपल्या करकमलाद्वारे शांतीचे प्रतीक असणारा मिशनचा श्वेत ध्वज फ़डकवला. या रॅलीमध्ये बॅंण्डच्या सूरात पी.टी.परेड, संगीतमय योगा, मानवी पिरॅमिड, मल्लखांब, ॲरोबिक, अम्ब्रेला फॉर्मेशन तसेच अनेक विविध खेळ व साहसी प्रकार प्रस्तुत केले.
त्याचबरोबर मिशनच्या शिकवणीवर आधारित विविध भाषांच्या माध्यमातून लघु नाटिका सादर करण्यात आल्या ज्याद्वारे भक्तीमधील सेवेचे महत्व अधोरेखित केले गेले तसेच अहंकार रहित होणे, सेवेमधील चेतनता व आदर भाव इत्यादी दिव्य गुण धारण करण्याची प्रेरणा देण्यात आली.
सेवादल व श्रद्धाळू भक्तगणांना संबोधित करताना सतगुरू माता सुदीक्षाजी महाराजांनी प्रतिपादन केले, की जीवनात निराकार परमात्म्याला प्राथमिकता देत समर्पित भावनेने सेवा करायची आहे. सेवा केवळ एक कार्य नसून ते पूर्ण मनोभावे श्रद्धा व सत्कार भावनेने करायची साधना आहे. सेवेच्या सोबत जीवनात सत्संगला महत्व देणे सुद्धा सेवेचेच एक रूप आहे. सेवेच्या मूळ भावनेला समजून केले गेलेले कार्यच जीवनामध्ये सुधारणा घडवते.
निरंकारी मिशनच्या नूतन साहित्याचे प्रकाशनः
समागमाच्या पहिल्या दिवशी सत्संग कार्यक्रमा दरम्यान सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या करकमला द्वारे समागम विशेषांक “आत्ममंथन” आणि ‘गुरूदेव हरदेव’ या पुस्तकाची नुतन भाषांतर आवृत्ती तसेच अन्य पुस्तकांच्या भाषांतर आवृत्तींचे प्रकाशन करण्यात आले. ही सर्व प्रकाशन सामग्री व मिशनच्या पत्र-पत्रिका समागम मध्ये लावलेल्या प्रकाशनाच्या स्टॉल्सवर अत्यंत माफ़क दरात उपलब्ध आहेत ज्याचा लाभ श्रद्धाळू भक्तगण मोठ्या उत्साहाने घेत आहेत.
लंगर व कॅंटीन व्यवस्था
समागमात येणाऱ्या सर्व श्रद्धाळूंसाठी दिवस-रात्र सामूहिक भोजनाची (लंगर) व्यवस्था मैदानाच्या तिन्ही भागांमध्ये केली आहे. या व्यतिरिक्त चार कॅंटीनची व्यवस्था करण्यात आली आहे ज्यामध्ये अत्यल्प दरात चहा, कॉफी, शीत पेये व अल्प-उपहार उपलब्ध आहेत. मिनरल वॉटरची देखील उचित व्यवस्था याच कॅंन्टीन्समध्ये करण्यात आली आहे.

