‘पिढी समानता आणि महिला सक्षमीकरण’ विषयावर परिसंवादाचे आयोजन
पुणे, दि. २५: कौटुंबिक हिंसाचार विरोधी दिनानिमित्त स्त्री आधार केंद्रातर्फे ‘पिढी समानता आणि महिला सक्षमीकरण’ या विषयावर दि.२४ रोजी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विधानपरिषदेच्या उपसभापती तथा स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, कायद्याचे प्रशिक्षण फक्त महिलांसाठीच नव्हे तर पुरुषांसाठीही आवश्यक आहे. पुरुषांचाही यात सक्रिय सहभाग असावा. लवकरच किमान तीन ठिकाणी असे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.
याशिवाय प्रत्येक शाळेतील स्कूल बसमध्ये परिचारिका नेमण्याबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी स्त्री आधार केंद्राकडून शाळांना पत्र पाठवले जाणार आहे. गुड टच आणि बॅड टचबाबत जागृती कार्यशाळाही घेण्यात येणार आहेत.
स्त्री आधार केंद्रातर्फे महिलांसाठी विधानभवन पाहणी दौराही लवकरच आयोजित केला जाणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान आरोग्य विषयावरही खुली चर्चा झाली. महिलांची सुरक्षितता, सक्षमीकरण आणि समुपदेशन या विषयांवरही लवकरच चर्चासत्रे आयोजित केली जाणार आहेत.
‘Transform Her’ या महिला उद्योजक गटातील महिला उद्योजकांनीही या परिसंवादात सहभाग घेतला.

