मुंबई-देशात आणि महाराष्ट्रात सुरू असलेल्या सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे कोण कोणासोबत कधी युती करेल किंवा कोणता नेता कधी पक्ष बदलेल, याचा अंदाज लावणं कठीण झालं आहे. अशाच अनपेक्षित राजकीय समीकरणांचा अनुभव सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात पाहायला मिळतो आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपविरोधात दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढवत असल्याने राज्यभरात चर्चेला उधाण आलं आहे. कट्टर विरोधक असलेल्या दोन शिवसेनेला एकत्र आणण्याची कसरत बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी केल्याचं सांगितलं जात आहे. या निर्णयामुळे अनेक नेते आणि राजकीय निरीक्षक चकित झाले असून, यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख सुषमा अंधारे यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.
सुषमा अंधारे यांनी ठामपणे सांगितले की, बार्शीतील हा निर्णय पक्षाचा अधिकृत निर्णय नाही. तो तिथल्या आमदारांनी त्यांच्या सदसद्विवेक बुद्धीने घेतलेला निर्णय आहे. शिवसेना युबीटीची अधिकृत भूमिका वेगळी असून, या युतीला पक्षाची मान्यता नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः आमदारांशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आम्ही भाजपला हरवण्यासाठी जे कोणी लढत आहेत, त्यांच्या सोबत आहोत. मात्र बार्शीतील युती ही आमची युती नाही, असे ठाम शब्दांत त्यांनी सांगितले. बार्शीत पक्षाला किंवा कार्यकर्त्यांना आपली गरज भासली, तर पक्षप्रमुखांशी चर्चा करून भूमिका ठरवू, असंही अंधारे म्हणाल्या.
भाजपवर टीका करताना सुषमा अंधारे यांनी तीव्र शब्दांचा वापर केला. भाजप हा काही धुतल्या तांदळाचा पक्ष नाही, असं म्हणत त्यांनी भाजपकडे पैशाची आणि सत्तेची ताकद अधिक असल्याचा आरोप केला. त्यांच्याकडे मनी आणि मसल पॉवर असेल, पण आमच्याकडे मेंटल पॉवर जास्त आहे, असं त्या म्हणाल्या. स्वतःबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, त्या एक साधी चळवळीतील कार्यकर्ती असून, महिला असल्याचं विक्टिम कार्ड कधीच खेळत नाहीत. सहकाऱ्यांनाही त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, मला बाई म्हणून हलक्यात घेऊ नका, घेतलंत तर अडचण होईल. मी आई-बहिणीसारखी वागते, पण संघटनेच्या कामात मी कठोर आणि ठाम आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
शिवसेनेत प्रथमच एका महिलेला जिल्हा संपर्कप्रमुखपद देण्यात आलं, याचा उल्लेख करत अंधारे यांनी पक्षाच्या निर्णयाचं समर्थन केलं. संघटना मजबूत करण्यासाठी जबाबदाऱ्या स्पष्टपणे दिल्या जात असल्याचं त्या म्हणाल्या. जे लोक शिवसेना सोडून भाजपमध्ये गेले, त्यांच्यावर कारवाई होणार का, या प्रश्नावर त्यांनी सूचक उत्तर दिलं. दिल्या घरी सुखी राहा, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे हे बागेश्वर बाबा नाहीत, असं सांगितलं. ते एकाच वेळी सर्व ठिकाणी उपस्थित राहू शकत नाहीत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात प्रतिनिधी नेमले असून, ते आपली जबाबदारी पार पाडत आहेत. जर कोणी ती जबाबदारी नीट पार पाडली नाही, तर आजपासूनच कारवाईची सुरुवात होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
भाजपवर हल्लाबोल करताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, भाजप हा नेते चोरणारा पक्ष आहे, तर शिवसेना नेते घडवणारा पक्ष आहे. शिवसेना हा 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण करणारा पक्ष असून, संघर्ष करत पुढे जाणारी संघटना आहे, असं त्या म्हणाल्या. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर भाष्य करताना त्यांनी सांगितलं की, हा जिल्हा पूर्वी काँग्रेसचा गड होता. मात्र काँग्रेसला मागे टाकत भाजप इथे पुढे आला, आणि यामागे सत्तेचा गैरवापर असल्याचा आरोप त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर केला.
जयकुमार गोरे यांनी प्रणिती शिंदेंबाबत केलेल्या वक्तव्यावरही सुषमा अंधारे यांनी खोचक टोला लगावला. त्यात काय विशेष आहे? तो भाजपचा संस्कार आहे, असं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली. कुलदीप सिंगरची मिरवणूक काढणारी आणि बदलापूर प्रकरणात तुषार आपटेला स्वीकारणारी भाजप असल्याचा उल्लेख करत त्यांनी भाजपच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. गोरे यांनी प्रणिती शिंदेंना भगिनी मानून काहीच बोलणार नाही, असं म्हटलं असतं, तर तीच खरी बातमी ठरली असती, असा टोमणाही त्यांनी लगावला.
इम्तियाज जलील यांच्या ‘महाराष्ट्र हिरवा करण्याच्या’ वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे यांनी उपरोधिक सवाल उपस्थित केला. इम्तियाज जलील यांच्याबद्दल आपल्याला आदर असल्याचं सांगून त्यांनी स्क्रिप्टेड गेममध्ये आपल्याला रस नसल्याचं स्पष्ट केलं. भाजपच्या झेंड्यात भगवा आणि हिरवा रंग आहे, कमळाच्या देठाचाही रंग हिरवाच आहे, मग हा हिरवा रंग म्हणजे एमआयएम आहे का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी भाजप आणि एमआयएम यांच्यातील राजकीय रंगसंगतीवर अप्रत्यक्ष टीका केली. एकूणच, बार्शीतील युतीवरून सुरू झालेल्या चर्चेला सुषमा अंधारेंच्या या आक्रमक भूमिकेमुळे नवं वळण मिळालं आहे.

