मिथिला महोत्सव मैथिली आणि मराठी भाषेच्या आदान-प्रदानासाठी महत्वपूर्ण
पुणे.दि. २५: मिथिला समाज संस्था, पुणे यांच्या वतीने लोहगाव येथील त्रिमूर्ती लॉन्समध्ये ‘आंतरराष्ट्रीय मिथिला महोत्सव २०२६’ हा भव्य कार्यक्रम दि. २४ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर माँ सरस्वती आणि माँ जानकीच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भाषणाची सुरुवात मैथिली भाषेत केली. त्या म्हणाल्या, “सभामे उपस्थित महोदय, अतिथि आ सब गोटे मैथिली भाषी बंधु-भगिनी सभ केँ हमर सादर प्रणाम, अंतरराष्ट्रीय मिथिला महोत्सवमे सहभागी होइत बहुत आनन्द होइत अछि.” या मैथिली भाषेतील सुरुवातीने उपस्थित मिथिला समाजबांधवांनी डॉ. गोऱ्हे यांना टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
डॉ. गोऱ्हे यांनी मिथिला संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, मिथिला ही केवळ भूभाग नाही, तर ज्ञानाची जननी, संस्कृतीची खाण आणि मैथिली भाषेची अमर भूमी आहे. विदेह राजा जनकांची राजधानी असलेल्या या भूमीत सीतामाईंचा जन्म झाला आणि विद्या-कला-साहित्याची परंपरा हजारो वर्षांपासून फुलत आली आहे.
बिहार आणि महाराष्ट्र यांच्यातील ऐतिहासिक व्यापार, राजकीय आणि सांस्कृतिक संवादाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, दोन्ही प्रदेशांमध्ये संस्कृतीचे संगम दिसून येतात. मिथिला ज्ञान, कला आणि संस्कृतीची भूमी आहे, तर पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. या महोत्सवामुळे या दोन भिन्न संस्कृतींचे मिलन साधले जात आहे.
मराठी संत साहित्य आणि मैथिलीतील विद्यापती यांच्या काव्यात साम्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. मधुबनी पेंटिंग, मैथिली भाषा आणि ‘अतिथी देवो भव’ ही पाहुणचाराची परंपरा यामुळे मिथिलाची ओळख जगभरात आहे. पुणे शहरही कला, संगीत आणि नाटकांसाठी प्रसिद्ध आहे.
सांस्कृतिक देवाणघेवाण राष्ट्राला जोडते आणि या महोत्सवामुळे मिथिला संस्कृतीचा वारसा तरुण पिढीपर्यंत पोहोचेल, अशी आशा डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली. हा महोत्सव मिथिला समाजाच्या पुण्यातील सांस्कृतिक एकतेचे प्रतीक असून, मैथिली आणि मराठी भाषेच्या आदान-प्रदानासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी शिवसेनेचे आनंद गोयल, गिरीश जैवळ, मीनाक्षी म्हस्के, हेमंत बत्ते, गायत्री भागवत, रिंकू मोरे, हेमलता बनसोडे, बिहार विधिमंडळाचे सदस्य घनश्याम ठाकूर, मुरारी मोहन झा, मिथिला समाज संस्थेचे पवन चौधरी, संगीता चौधरी, जटाशंकर चौधरी, ऋषि झा, सुनीता कर्ण आदी मान्यवर उपस्थित होते.
महोत्सवात मिथिला संस्कृतीचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमाला मिथिला समाजातील मोठ्या संख्येने बंधू-भगिनी उपस्थित होते.

