भारतीय आयुर्वेद संस्थेच्या धन्वंतरी पुरस्कारांचे वितरण
पुणे: आयुर्वेद ही केवळ उपचारपद्धती नव्हे, तर भारतीय जीवनदृष्टी आहे. आधुनिक जीवनशैलीत आयुर्वेदाचे महत्व अधिकच वाढले आहे. जागतिक पातळीवर आयुर्वेदाला विश्वासार्हता मिळवून देण्यासाठी संशोधन, प्रमाणबद्धता आणि वैज्ञानिक दस्तऐवजीकरणावर भर देणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन बिहारचे राज्यपाल आरिफ मोहंमद खान यांनी केले.
भारतीय आयुर्वेद संस्थेच्या वतीने आयोजित राष्ट्रीय आयुर्वेद संभाषा परिषद व राज्यस्तरीय धन्वंतरी पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या डॉ. शिरामाने सभागृहात आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याच्या आरोग्य शिक्षण विभागाचे सहसचिव रामचंद्र धनावडे यांच्या हस्ते झाले. प्रसंगी आयुर्वेद क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वैद्य रणजीत पुराणिक, वैद्य जीवन बच्छाव (आयआरएस), वैद्य संतोष नेवपूरकर, वैद्य प्रशांत बागेवाडीकर, वैद्य वंदना सिरोहा, वैद्य अनिल बनसोडे, वैद्य प्रियदर्शिनी कडूस, वैद्य किरण पंडित यांना ‘आयुर्वेद गौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी आयुर्वेद शिक्षण व्यवस्थेसाठी दृष्टीकोन व व्याप्ती, तसेच राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध कोर्सेसबाबत वैद्य किरण पंडित यांनी माहिती दिली. विश्वानंद आयुर्वेद चिकित्सालय व गुरुकुलचे संचालक वैद्य अनिल बनसोडे यांनी ‘आयुर्वेद प्रॅक्टिस कशी उभारावी व वाढवावी?’ याबाबत प्रात्यक्षिकांसह विश्लेषण केले. श्री आयुर्वेद अँड हॉस्पिटलचे संचालक वैद्य प्रशांत दौंडकर-पाटील यांनी ‘आयुर्वेद ओपीडी, हॉस्पिटल नोंदणी, ओपीडी व आयपीडी पंचकर्मासाठी कॅशलेस मेडिक्लेम एम्पॅनेलमेंट’ याविषयी मार्गदर्शन केले.
श्री धूतपापेश्वरचे सीईओ वैद्य रणजीत पुराणिक, आयुर्वेद व्यासपीठाचे माजी अध्यक्ष वैद्य संतोष नेवपूरकर, बागेवाडीकर आयुर्वेद रसशाळेचे संचालक वैद्य प्रशांत बागेवाडीकर, आयुष मंत्र्यांचे खासगी सचिव वैद्य जीवन बच्छाव यांनी आयुर्वेद क्षेत्राचा आजवरचा प्रवास, आधुनिक वैद्यक शास्त्रात आयुर्वेदाची भूमिका, वैद्यांसमोरील आव्हाने व अडचणी, तसेच विद्यार्थ्यांसाठी आयुर्वेद क्षेत्रामध्ये उपलब्ध असणाऱ्या जागतिक पातळीवरील विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. वैद्य हरीश पाटणकर व वैद्य प्रेरणा बेरी यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
भारतीय आयुर्वेद संस्थेचे कार्याध्यक्ष वैद्य प्रशांत दौंडकर-पाटील, सचिव संकेत खरपुडे, वैद्य सुकुमार सरदेशमुख, वैद्य राहुल शेलार, वैद्य प्रिया दौंडकर-पाटील, वैद्य सोनल सोमानी यांनी यशस्वी संयोजन केले. श्री आयुर्वेद अँड पंचकर्म हॉस्पिटल व वर्मा फाउंडेशनचे या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले.
“शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारी आयुर्वेदाची संकल्पना आजच्या तणावपूर्ण काळात अत्यंत उपयुक्त ठरत आहे. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेत आयुर्वेदाची भूमिका भविष्यात निर्णायक ठरू शकते. त्यामुळे आधुनिक विज्ञानाशी समन्वय साधत आयुर्वेदातील मूलतत्त्वे जपण्याची गरज असून, तरुण वैद्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करत संशोधनाकडे वळावे.”
– आरिफ मोहंमद खान, बिहारचे राज्यपाल

