-बालशिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम कोथरूड येथे आयोजित स्पर्धेची सांगता
आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू तेजल हसबनीस यांच्या हस्ते बक्षीस वितरण
पुणे: महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या (मएसो) क्रीडावर्धिनी आणि कोथरूड येथील बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मएसो क्रीडा करंडक २०२६’ या राज्यस्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद मएसो ज्ञानमंदिर कळंबोली या शाळेने पटकवले. यासह ही फिरता करंडकाचीही मानकरी ठरली. या स्पर्धेचे हे १४ वे वर्ष होते.
प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ही तीन दिवसीय निवासी क्रीडा स्पर्धा बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल, मयूर कॉलनी कोथरूड येथे पार पडली. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू तेजल हसबनीस यांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण रविवारी झाले. प्रसंगी ‘मएसो’चे उपाध्यक्ष प्रदीप नाईक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, क्रीडावर्धिनी व शाला समितीचे अध्यक्ष विजय भालेराव, ‘मएसो’चे सचिव अतुल कुलकर्णी, सहसचिव सुधीर भोसले, शाला समिती महामात्र डाॅ. नेहा देशपांडे, मुख्याध्यापिका अदिती कुलकर्णी, मंजुषा दुर्वे, सायली देशमुख यांच्यासह संस्थेचे व शाळेचे पदाधिकारी उपस्थित होते.
तेजल हसबनीस म्हणाल्या, “विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासून क्रीडासंस्कृती रुजविण्यासाठी अशा स्पर्धा महत्वाच्या असतात. त्यांच्यात संघभावना, शिस्त, प्रामाणिकपणा, आत्मविश्वास आणि खेळाडूवृत्ती विकसित होते. चांगला माणूस होण्यासाठी खेळांतून प्रोत्साहन मिळते.”
प्रदीप नाईक यांनी अध्यक्षीय मनोगतात सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. भविष्यात तुमच्यातील काही विद्यार्थी ऑलिम्पिकमध्येही भारताचे प्रतिनिधित्व करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढील वर्षीचा ‘मएसो क्रीडा करंडक’ पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके महाविद्यालय येथे आयोजिला जाणार असल्याचे विजय भालेराव यांनी घोषित केले.
बाबासाहेब शिंदे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. डाॅ. वैशाली कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. मंजुषा दुर्वे यांनी आभार मानले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात शाळेच्या सर्व शिक्षिका, क्रीडाशिक्षक यांनी क्रीडास्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
या शाळा ठरल्या विजेत्या
यामध्ये मुले व मुली या गटांत सूर्यनमस्कार, लंगडी, डॉजबॉल आणि गोल खो-खो या सांघिक मैदानी स्पर्धा झाल्या. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सांघिक व वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली. सूर्यनमस्कार स्पर्धेत मुलांमध्ये ज्ञानमंदिर कळंबोली, पब्लिक स्कुल कळंबोली, दामोदर शंकर रेणावीकर विद्यामंदिर अहिल्यानगर, तर मुलींमध्ये ज्ञानमंदिर कळंबोली, पब्लिक स्कुल कळंबोली, बालविकास मंदिर सासवड, लंगडी स्पर्धेत मुलांमध्ये निर्मला देशपांडे विद्यालय बारामती, इंग्लिश मिडीयम स्कुल शिरवळ, ह. ग. देशपांडे बारामती, तर मुलींमध्ये इंग्लिश मिडीयम स्कुल शिरवळ, निर्मला देशपांडे विद्यालय बारामती, विद्यामंदिर बेलापूर, डॉजबॉल स्पर्धेत मुलांमध्ये विद्यामंदिर बेलापूर, ज्ञानमंदिर कळंबोली, निर्मला देशपांडे विद्यालय बारामती, तर मुलींमध्ये बालविकास मंदिर सासवड, निर्मला देशपांडे विद्यालय बारामती, इंग्लिश मिडीयम स्कुल शिरवळ, गोल खोखो स्पर्धेत मुलांमध्ये निर्मला देशपांडे विद्यालय बारामती, ज्ञानमंदिर कळंबोली, इंग्लिश मिडीयम स्कुल शिरवळ, तर मुलींमध्ये ज्ञानमंदिर कळंबोली, निर्मला देशपांडे विद्यालय बारामती, बालविकास मंदिर सासवड यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवला.

