हवेली :जिल्हा परिषद व पंचायत समिती हवेली सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंगरगाव येथे SVEEP कार्यक्रम कक्षांतर्गत कक्ष अधिकारी हेमंतकुमार खाडे यांच्या नेतृत्वात मतदार जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करणे व लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग वाढवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमास डोंगरगावच्या विद्यमान सरपंच सौ. रजनीताई कांबळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगावच्या शाळा व्यवस्थापन समितीतील महिला सदस्य, ग्रामस्थ, विद्यार्थी तसेच शालेय पोषण आहारच्या स्वयंपाकी जायभाई वाघमारे व मदतनीस पारूबाई कांबळे यांची उपस्थिती होती. याशिवाय मुख्याध्यापिका अलका साकोरे, स्वीप कक्षातील सदस्य व शिक्षिका तृप्ती तोडकर यांचाही सक्रिय सहभाग लाभला.
SVEEP कार्यक्रम कक्षांतर्गत सकाळी संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. “लोकशाही बळकट करूया, मतदानाचा हक्क बजावूया” व “मतदान हेच लोकशाहीचे बळ” अशा घोषणांद्वारे प्रभावी जनजागृती करण्यात आली. प्रभात फेरीनंतर उपस्थित मतदार, शिक्षक व ग्रामस्थांनी मतदार शपथ घेत लोकशाहीप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली.
या कार्यक्रमास निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने तसेच मा. तहसीलदार मा. अर्चना निकम व मा. तृप्ती कोलते यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी मतदानाचे महत्त्व, नागरिकांची जबाबदारी आणि निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. SVEEP कार्यक्रमामुळे डोंगरगावमध्ये मतदानाबाबत सकारात्मक संदेश पोहोचला असून, आगामी निवडणुकीत अधिकाधिक मतदार सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
डोंगरगाव येथे SVEEP कार्यक्रमातून मतदार जनजागृतीला उत्स्फूर्त प्रतिसाद
Date:

