‘वंदे मातरम्’चे अभ्यासक मिलिंद सबनीस यांचा स्वानंद फाऊंडेशन, संवाद पुणेतर्फे विशेष सन्मान
पुणे : ‘वंदे मातरम्’चा नारा देत अनेक क्रांतिकारक, जवानांनी आपले आयुष्य पणाला लावत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. देशप्रेम जागृत करणाऱ्या ‘वंदे मातरम्’ आणि ‘जन गण मन’ या गीतांना योग्य तो सन्मान देताना उदासीनता न दाखविता मनात राष्ट्रभावना जागृत ठेवावी. आपण या देशाचे नागरिकच नव्हे तर एक सैनिक आहोत ही भावना मनात ठेवून प्रत्येक कृतीतून ती दिसावी अशी अपेक्षा लेफ्टनंट जनरल एस. एस. हसबनीस यांनी व्यक्त केली.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत आणि ‘वन्दे मातरम्’ या गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त स्वानंद फाऊंडेशन आणि संवाद, पुणे यांच्या वतीने ‘वन्दे मातरम्’चे अभ्यास मिलिंद प्रभाकर सबनीस यांचा आज (दि. २४) लेफ्टनंट जनरल एस. एस. हसबनीस यांच्या हस्ते मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. त्या वेळी हसबनीस बोलत होते. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वानंद फाऊंडेशनचे संजीव शहा, साधना शहा, संवाद पुणेचे सुनील महाजन, निकिता मोघे, केतकी महाजन-बोरकर मंचावर होते. शाल, सन्मानपत्र आणि भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी ‘वन्दे मातरम्’ या मराठी पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. ही पुस्तिका महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने वितरित केली जाणार आहे.
एस. एस. हसबनीस पुढे म्हणाले, ‘वन्दे मातरम्’ या गीतातील भावना, प्रेरणा सैनिकांच्या मनात रुजल्याने आजही आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. त्यामुळेच देशातील सामान्य नागरिकही निर्भयपणे वावरत आहेत. देशातील प्रत्येक नागरिकाने ‘वन्दे मातरम्’ या शब्दाविषयी कृतज्ञ राहून देशाचा शिपाई आहोत या भावनेने कार्य केल्यास देश समृद्ध आणि शक्तीशाली होईल.
‘वन्दे मातरम्’ अगणित वर्षे गायले जाईल : मिलिंद सबनीस
सत्काराला उत्तर देताना मिलिंद सबनीस म्हणाले, ‘वन्दे मातरम्’ हा मंत्र पुन्हा एकदा जनमानसापर्यंत पोहोचावा या हेतूने सातत्याने कार्यरत आहे. दि. २४ जानेवारी १९५० रोजी ‘वन्दे मातरम्’ या गीताला समान राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला. ‘वन्दे मातरम’ या दोन शब्दांनी देशाचा संपूर्ण इतिहास बदलला गेला. एखाद्या साहित्यकृतीची जयंती साजरी व्हावी हे भाग्य आहे. हे गीत जनसामान्यांना जागे करण्यासाठी निर्माण झाले आहे हा विश्वास बंकीमचंद्र यांना होता. या ऋषितुल्य व्यक्तीची साधना आणि तपस्या महनीय होती. हे गीत अगणित वर्षे स्वाभिमानाने गायले जाईल, असा विश्वास आहे.
स्वागतपर प्रास्ताविकात सुनील महाजन यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. संजीव शहा यांनी स्वानंद फाऊंडेशनच्या कार्याविषयी माहिती दिली. मान्यवरांचा सन्मान संजीव शहा, निकिता मोघे, केतकी महाजन-बोरकर यांनी केला. सूत्रसंचालन योगेश सुपेकर यांनी केले तर आभार श्रुती साठे यांनी मानले. मानपत्राचे लेखन वलय मुळगुंद यांचे होते.
‘माँ तुझे सलाम’…
या निमित्ताने ‘माँ तुझे सलाम’ हा देशभक्तीपर हिंदी, मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जितेंद्र भुरुक, अश्र्विनी कुरपे, कविता जावळेकर, आकाश सोलंकी, बबलू खेडकर यांनी ‘मा तुझे सलाम’, ‘कर चले हम फिदा’, ‘नन्हा मुन्ना राही हू’, ‘मेरे देश की धरती’, ‘संदेसे आते है’, ‘जयोस्तुते’, ‘वन्दे मारतम्’ आदी देशभक्तीपर गीते सादर केली. सोमनाथ फोटके, रोहित साने, रशिद शेख, अमन सय्यद यांनी साथसंगत केली.

