पुणे: पुण्याच्या मध्यवस्तीतील मुख्य बाजारपेठ असलेल्या महात्मा फुले मंडईत अपुऱ्या प्रकाश व्यवस्थेमुळे झालेली अडचण अवघ्या तीन दिवसात दूर करण्यात आली आहे. नवनिर्वाचित नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी येथील पाहणी केल्यानंतर, आता नवे विद्युत दिवे बसवण्यात आले असून, पुरेसा प्रकाश उपलब्ध झाल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
१३५ वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेली महात्मा फुले मंडई पुण्याची मुख्य बाजारपेठेपैकी एक आहे. तीन दिवसांपूर्वी येथे समस्या जाणून घेण्यासाठी राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी नुकतीच भेट दिली होती. त्यावेळी व्यापाऱ्यांनी प्रकाश व्यवस्थेची समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली. येथील विद्युत दिव्यांची क्षमता कमी झाल्याने, तसेच अनेक दिवे नादुरुस्त झाल्याने व्यापारी व नागरिकांना सायंकाळच्या वेळी अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यावर उपाय म्हणून तातडीने हे दिवे बदलण्याचे काम हाती घेण्यात आले. हे काम तीन दिवसांत पूर्ण करण्यात आल्यानंतर आज मंडई येथे बाप्पु मानकर यांनी भेट दिली.

‘व्यापाऱ्यांना नागरिकांना भेडसावणारी ही समस्या सोडविण्यासाठी तातडीने काम हाती घेतले. येथील अनेक दिव्यांची क्षमता कमी झाल्याने नवे ५० दिवे बसवण्यात आले आहेत. आता पुरेशी प्रकाश व्यवस्था झाली आहे. तातडीची गरज म्हणून हे काम करण्यात आले आहे. लवकरच संपूर्ण मंडई परिसरातील विद्युत दिव्यांचे काम हाती घेण्यात येणार आहे. स्थानिकांसोबतच संपूर्ण शहरातून नागरिक येथे खरेदीसाठी येतात. त्यामुळे मंडईतील इतर समस्यांबाबतही नेहमी कटिबद्ध राहणार असल्याचे, प्रभाग २५ चे नवनिर्वाचित नगरसेवक मा. राघवेंद्र बाप्पू मानकर सांगितले.
यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितले की, ‘मंडईतील जुने झालेले विद्युत दिवे आणि अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे व्यापारी तसेच खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत होता. बाप्पु मानकर यांना ही बाब निदर्शनास आणून देताच, त्यांनी त्वरित हे काम सुरू केले. वेगाने हे काम पूर्ण केल्याबद्दल त्यांचे आम्ही समाधानी आहोत.’ यावेळी उपस्थित व्यापारी व खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनी बाप्पु मानकर यांचे आभार मानले.

