पुणे —
महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणुकीत समविचारी साहित्यप्रेमी एकत्र येत ‘साहित्य संवर्धन आघाडी’ ची स्थापना करण्यात आली असून ही आघाडी आगामी निवडणूक लढवणार आहे. परिषदेमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने ही आघाडी स्थापन करण्यात आल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या आघाडीच्या वतीने योगेश सोमण अध्यक्षपदासाठी उमेदवार असून प्रदीप निफाडकर कोषाध्यक्षपदासाठी तर डॉ. स्वाती महाळंक प्रमुख कार्यवाहपदासाठी निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय इतर विभागांसाठी सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. व्याखाने व स्मृतिदिन विभागासाठी सुनील महाजन, ग्रंथनिवड विभागासाठी हेमंत मावळे, पारितोषिके विभागासाठी सुनेत्रा मंकणी, ग्रंथालय विभागासाठी प्रसाद मिरासदार, परीक्षा विभागासाठी कुणाल ओंबासे, वास्तू देखभाल विभागासाठी नितीन संगमनेरकर आणि वर्धापन पारितोषिके विभागासाठी डॉ. गणेश राऊत यांचा समावेश आहे. तर संदीप तापकीर यांना पुणे जिल्हा प्रतिनिधी पदासाठी पॅनलच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे.
यावेळी बोलताना योगेश सोमण म्हणाले की, “दहा वर्षांनंतर ही निवडणूक होत असून परिषदेमध्ये बदल घडवून आणण्याची गरज आहे. त्या दृष्टीने आमचा जाहीरनामा आगामी दोन दिवसांत प्रसिद्ध केला जाईल. राज्यभरात सुमारे १६ हजार मतदार असून प्रत्येक मतदारापर्यंत मतपत्रिका पोहोचाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. अधिकाधिक मतदान व्हावे, ही आमची भूमिका आहे. सातारा साहित्य संमेलनाच्या आर्थिक व प्रशासकीय व्यवहारांचा हिशेब सर्वांसमोर आणून आवश्यक ती चौकशी केली जाईल.”
कोषाध्यक्षपदाचे उमेदवार प्रदीप निफाडकर म्हणाले, “निवडून आल्यावर आम्ही कोणती कामे करणार आहोत, याची सविस्तर माहिती मतदारांना दिली जाईल. १४० वर्षांची परंपरा असलेल्या या संस्थेचे कामकाज पारदर्शक आणि सुयोग्य पद्धतीने चालावे, यासाठी आमचा लढा आहे. यापूर्वीच्या कार्यकाळातील अनेक बाबी प्रसारमाध्यमांतून उघडकीस आल्या आहेत. पुणे हे सांस्कृतिक शहर असून महाराष्ट्र साहित्य परिषद ही त्याची शान आहे.”
ते पुढे म्हणाले की, “निवडणूक प्रक्रियेत दबाव, मतपेटी पळवणे, मतपत्रिका गायब होणे, आमिषे दाखवणे असे प्रकार घडले आहेत. ही लढाई धमकी विरुद्ध विनंती, लालुच विरुद्ध प्रतिष्ठा अशी आहे. मतदार यादी सदोष असून ती पारदर्शक करण्याचा आमचा मानस आहे. सध्याची निवडणूक प्रक्रिया घटनेनुसार होत नसल्याचा आमचा आरोप आहे.”
महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणूक :‘साहित्य संवर्धन आघाडी’ मैदानात
Date:

